कामावर सुट्टी टाकून ‘लम्पी’ला रोखण्यासाठी उतरली तरुणाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 08:41 AM2022-09-22T08:41:50+5:302022-09-22T08:42:11+5:30
व्हाॅईस फॉर स्पीचलेस या संस्थेतील तरुणांची फौज पशुधन वाचविण्याची मोहीम राबवित आहे.
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोणी बँकिंग क्षेत्रात, कोणी हाॅटेलिंग, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये, तर कोणी सिक्युरिटी क्षेत्रात, कोणी विद्यार्थी, पण कामावर सुट्टी टाकून यातील तरुणाई ‘लम्पी’ला रोखण्यासाठी गावागावांतील रस्त्यांवर उतरली आहे. ही तरुणाई श्वानासह इतर प्राण्यांसाठी आजपर्यंत काम करीत होती. लम्पी प्रकोपाच्या संकटात आता पशुधन वाचविण्यासाठी ते लसीकरणासाठी रात्रीचा दिवस करून प्रयत्न करीत आहेत. पशुसंवर्धन विभागाबरोबर स्वत:च्या पैशांमधूनही लसी घेऊन पशुधन सुरक्षा देण्यासाठी झटत आहेत.
व्हाॅईस फॉर स्पीचलेस या संस्थेतील तरुणांची फौज पशुधन वाचविण्याची मोहीम राबवित आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते तुडवत पशुधनाच्या लसीकरणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्यासाठी त्यांना पशुसंवर्धन विभागाची मदत आणि मार्गदर्शन मिळत आहे. संस्थेचे सदस्य गोविंद इनामदार, रोहित राठोड, जफर शेख, आदित्य देशमुख, सुमित इंगळे, प्रमोद वाघ, सागर कसाब, प्रतीक जाधव आदी यासाठी प्रयत्नशील आहेत.
६०० पशुधनाचे लसीकरण
गेल्या काही दिवसांत ६०० पशुधनाचे लसीकरण केले आहे. यात ३०० लसी पशुसंवर्धन विभागातर्फे मिळाल्या आहेत. इंजेक्शन देणाऱ्या डाॅक्टरांचा खर्चही आम्ही करीत आहोत. उर्वरित लसी स्वत:च्या खर्चातून घेतल्या. गोरक्षक किरण सुरे, जिल्हा प्राणी क्लेशप्रतिबंधक समितीच्या राजपूत, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सुभाष वानखेडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे पाठबळ मिळाले.
- गोविंद इनामदार,
व्हॉइस फॉर स्पीचलेस