सुरक्षारक्षकांचे हातपाय बांधून १८ लाखाच्या अल्युमिनियम तारेची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 07:04 PM2020-01-27T19:04:21+5:302020-01-27T19:06:04+5:30
चार चोरट्यांनी केले अल्युमिनियम पसार
करमाड : वॉचमनचे हातपाय बांधून १८ लाखाचे अल्युमिनियम तारेचे ९ ड्रम घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना लालवाडी येथे शनिवारी रात्री (दि.२५) उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, महापारेषणच्या वतीने लालवाडी येथे (ता. औरंगाबाद) हायटेंशन लाईन ओढण्याचे काम चालू आहे. या कामाचा ठेका लाल महंमद अब्दुल सत्तार(रा. कुमरिया जि. मालदा पश्चिम बंगाल) यांनी घेतला आहे. लालवाडी येथे कंपनीचे कामगार एक तंबू टाकून राहत असून याच ठिकाणी अल्युमिनियम तारेचे ड्रम ठेवण्यात आले होते. याठिकाणी मोकळेसूर रहेमान अब्दुल(रा.कतलामाही,ता. श्रीपुर, जि. मालदा पश्चिम बंगाल) हे व अन्य एकजण सुरक्षेची जबाबदारी पार पाडत होते. शनिवारी(दि.२५) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास याठिकाणी २५-३५ वयोगटातील ४ चोरटे आले. त्यांनी दोन्ही सुरक्षारक्षकाचे हातपाय दोरीने बांधले. यानंतर हायड्रा मशीनच्या सहाय्याने अल्युमिनियम तारेचे ९ ड्रम गाडीत टाकून चोरटे पसार झाले.
सुरक्षारक्षकांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश जागडे, राजू नागलोत, सूर्यकांत पाटील, घुनावत करीत आहेत.