नगरसेविकेच्या घरी चोरी; साडेसात लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:26 AM2017-11-01T00:26:11+5:302017-11-01T00:26:44+5:30
नगरसेविका रेश्मा अश्फाक कुरैशी यांचे घर फोडून चोरट्यांनी दागिने व रोख असा साडेसात लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला़
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात चोरट्यांची दिवाळी सुरूच आहे़ एका आठवड्यात शहरात तब्बल चार धाडसी घरफोड्या झाल्या आहेत़ त्या प्रकरणाचा सुगावा अद्याप लागलेला नसतानाच समतानगर वार्ड क्र. ६६ येथील नगरसेविका रेश्मा अश्फाक कुरैशी यांचे घर फोडून चोरट्यांनी दागिने व रोख असा साडेसात लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला़ ही धाडसी घरफोडी सोमवारी (दि़.३०) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ मंगळवारी (दि़ ३१) क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा अश्फाक कुरैशी यांच्या लहान नणंदेचे लग्न होते. समतानगरमध्ये अश्फाक शेख व त्यांचे सात भाऊ हे एका घरात राहतात. घरातील सर्व सदस्य सायंकाळी विवाहाच्या निमित्ताने घराबाहेर पडले. ही संधी साधून चोरट्यांनी अश्फाक यांच्या भावाच्या खोलीचे कुलूप तोडून कपाटातील रोख ४ लाख आणि ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा अंदाजे साडेसात लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ अश्फाक यांचे भाऊ मस्लोद्दीन यांच्या खोलीत ही चोरीची घटना घडली़ शिवाय मस्लोद्दीन यांच्या खोलीला लागूनच असलेली त्यांचा लहान भाऊ एजाज यांची रूमदेखील चोरट्यांंनी फोडली. त्यांच्या घरातील कपाटाचे लॉकर फोडण्याचा प्रयत्न असफल ठरला. लॉकर मजबूत असल्याने चोरट्यांच्या हाती एजाज यांच्या खोलीतून काहीच लागले नाही.
रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मस्लोद्दीन घरी आले असता, त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना दिली.
चोरटा कॅमे-यात कैद
कुरैशी यांच्या घराजवळ एका बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तसेच मुख्य रस्त्यावरील मेडिकलवरही सीसीटीव्ही कॅमे-यात आरोपी कैद झाल्याचे कुरैशी यांनी सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले असून, आरोपींचा पोलीस शोध पोलीस घेत आहेत.