मिनी घाटीत पाच रेमडेसिविरची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:05 AM2021-04-25T04:05:01+5:302021-04-25T04:05:01+5:30
औरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनची चिकलठाणा येथील सिव्हिल हॉस्पिटल (मिनी घाटी)मधून चोरी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी समोर आली. याप्रकरणी ...
औरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनची चिकलठाणा येथील सिव्हिल हॉस्पिटल (मिनी घाटी)मधून चोरी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी समोर आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिनी घाटीतील एका कोविड वॉर्डात उपचार घेणाऱ्या रुग्णासाठी प्रशासनाने २३ एप्रिल रोजी रात्रपाळीच्या इंचार्ज सिस्टरला १६ रेमडेसिविर इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या ट्रे मध्ये ठेवले होते. रात्री एकाही रुग्णाला रेमडेसिविर देण्याची आवश्यकता भासली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची ड्यूटी संपल्यानंतर दुसऱ्या सिस्टरला चार्ज देत असताना त्यांना तेथील ट्रे मध्ये केवळ ११ रेमडेसिविर दिसले. त्यांना मिळालेल्या १६ रेमडेसिविरपैकी ५ रेमडेसिविर चोरीला गेल्याचे त्यांना दिसले. मिनी घाटीच्या सुरक्षेसाठी तेथे स्वतंत्र सुरक्षारक्षक तैनात आहेत. असे असताना पाच रेमडेसिविर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने सिस्टरने थेट सिव्हिल सर्जन डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांना या घटनेची लेखी माहिती दिली. यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी त्यांना पोलिसांत तक्रार करण्याची सूचना केली. यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे सूत्राने सांगितले.
चौकट
आठ दिवसांपूर्वी रेमडेसिविरची जादा दराने विक्री करणाऱ्या मिनी घाटीच्या एका कर्मचाऱ्यासह दोन मेडिकल चालकांना पोलिसांनी अटक केली होती. रेमडेसिविरला काळ्या बाजारात चढ्या दराने मागणी आहे. रुग्णाचे नातेवाईक मिळेल त्या किमतीत रेमडेसिविर खरेदी करीत आहेत. यामुळे मिनी घाटीतील चोरीला गेलेले रेमडेसिविर ब्लॅक मार्केटमध्ये विकण्यासाठी चोरट्यांनी नेल्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट
पाच रेमडेसिविर चोरीला गेल्याची तक्रार एका नर्सने शनिवारी सकाळी केली. त्यांना याविषयी पोलिसांत तक्रार करण्याची सूचना केली आहे.
- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, सिव्हिल सर्जन