मतमोजणीच्या गर्दीत हातचलाखी; मालेगावची टोळी अटकेत, ८ मोबाइलसह धारदार शस्त्र जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 11:25 AM2024-11-25T11:25:20+5:302024-11-25T12:02:26+5:30
जवाहरनगर पोलिसांची कारवाई : आरोपींमध्ये सहा जणांचा समावेश
छत्रपती संभाजीनगर : शहरातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत घुसून मोबाइलसह अन्य महागड्या वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या मालेगावच्या टोळीला जवाहरनगर पोलिसांनी शनिवारी गजाआड केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी कुकरी, चाकू, फायटर, कार आणि चोरीच्या ८ मोबाइलसह ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या पकडलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद सैझाद शेख, शेख इमरान शेख अजीज, उमर फारूख शेख रफिक, शेख लतीफ शेख अतीक, मोहंमद मोसीन अब्दुल हमीद शेख आणि अरबाज शेख फिरोज शेख (सर्व रा. मालेगाव) या सहा जणांचा समावेश आहे.
औरंगाबाद पूर्व विधानसभेची मतमोजणी एसएफएस स्कूलमध्ये होती. याठिकाणी भाजपचे अतुल सावे यांच्याविरुद्ध एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीकडे शहराचे लक्ष लागले होते. त्यामुळे निकाल ऐकण्यासाठी शाळेच्या मैदानावर समर्थकांनी मोठी गर्दी झाली होती. संध्याकाळी सावे यांना विजयी घोषित केल्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी बळाचा वापर केला. त्याचवेळी कार्यकर्त्यांचे मोबाइल लंपास करणारी टोळी गर्दीत घुसली. त्यांनी अनेकांच्या मोबाइलवर डल्लाही मारला. मोबाइल चोरी करणारा एक संशयित तेथे बंदोबस्तावरील पोलिसांना दिसला. पोलिसांना पाहून तो पळू लागला. पोलिस त्याच्या दिशेने जाताच तो एका कारमध्ये (एमएच ४१, एझेड ४१६१) मध्ये बसला. कार सिडको चौकाच्या दिशेने सुसाट निघून गेली. पोलिसांचा संशय बळावल्यामुळे उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, सहायक फौजदार चंद्रकांत पोटे, पाशू शहा, मारोती गोरे, श्रीकांत काळे, बाळासाहेब बैरागी, ज्ञानेश्वर शेलार, राम रावते यांच्या पथकाने कारचा पाठलाग सुरू केला. कार सिडको बसस्थानक मार्गे हर्सूल टी रस्त्याने गेली. पोलिसांनी पाठलाग करून हर्सूल टी पॉइंटजवळ चोरट्यांना रोखल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारमध्ये सापडला मुद्देमाल
आरोपींना कारमधून खाली उतरवल्यानंतर कारची झडती घेतली. तेव्हा कारच्या सीटच्या पाठीमागील भागात वेगवेगळ्या कंपनीचे ८ मोबाइल आढळले. डिकीत प्लास्टिकच्या पिशवीत धारदार कुकरी, चाकू, फायटर सापडले.