समृद्धी महामार्गाच्या साहित्यांची रात्री चोरीकरून सकाळी भंगारात विक्री; दोघे रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 05:31 PM2022-01-06T17:31:22+5:302022-01-06T17:31:48+5:30
हर्सूल ते जटवाडा परिसरात करायचे रात्री चोरी, सकाळी सामान नारेगावात करायचे विक्री
औरंगाबाद : जटवाडा परिसरातील जोगवाड्याजवळ समृद्धी महामार्गाच्या कामासाठी आणून ठेवण्यात आलेले लोखंडी बीम, सळईची चोरी करणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आरोपीकडून १ लाख ८० रुपये किमतीचे लोखंडी बीम, सळई आणि एक रिक्षा जप्त केली.
शेख सलाउद्दीन आणि शेख अरबाज अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. याविषयी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले की, हर्सूल परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने कामाच्या साईटवर मोठ्या प्रमाणात लोखंडी सळई, बीम, सिमेंट आणि इतर साहित्य विविध ठिकाणी ठेवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणाहून लोखंडी बीम आणि सळई, भंगार साहित्य चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत.
चोरलेले साहित्य चोरटे नारेगाव आणि रोशन गेट येथील भंगारवाल्यांना विक्री करतात, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि त्यांच्या पथकाला मिळाली. पोलीस गेल्या काही दिवसांपासून नजर ठेवून होते. मंगळवारी रात्री त्यांनी समृद्धी महामार्गाच्या जोगवाडा येथील साईटवर ठेवलेले बीम आणि लोखंडी सळई, भंगार साहित्य चोरले. हे साहित्य रिक्षातून त्यांनी त्यांच्या घरी नेले. तेथून बुधवारी सकाळी ते नारेगाव येथील एका व्यापाऱ्याला विक्री करण्यासाठी रिक्षातून घेऊन गेले. पोलिसांनी त्यांना पकडले. कसून चौकशी केली असता त्यांच्यापैकी एक अल्पवयीन निघाला. त्याला पालकांच्या ताब्यात दिल्यानंतर उर्वरित आरोपी शेख सलाउद्दीन आणि अरबाजला हर्सूल पोलिसांच्या ताब्यात दिले.
कंपनीने नोंदविला गुन्हा
समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना या चोरीची माहिती मिळताच कंपनीचे अधिकारी चिलंग्गी रामाणजुला रंगा रेड्डी यांनी हर्सूल पोलीस ठाण्यात या चोरीविषयी तक्रार नोंदविली. या तक्रारीत त्यांनी १ लाख ८० हजाराचे साहित्य चोरीला गेल्याचे नमूद केले.