भुरट्या चाेरांच्या ‘समृद्धी’चा महामार्ग; सोलार बॅटरी, स्पीड बोर्डच्या चोरीने अपघात वाढणार
By विकास राऊत | Published: September 26, 2023 12:43 PM2023-09-26T12:43:49+5:302023-09-26T12:44:48+5:30
एमएसआरडीसी अधीक्षक अभियंत्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११० किमीच्या हद्दीतील चोऱ्यांचे सत्र थांबविण्यासाठी पोलिस आयुक्त, अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीला खुला झाल्यानंतर अपघातांच्या सत्रामुळे तो चर्चेत आला. आता त्या महामार्गावर वाहतुकीच्या दृष्टीने बसविण्यात आलेले सोलार बल्ब, बॅटऱ्या, स्पीड बोर्ड, रेडियम, लोखंडी बॅरिकेट्स यांच्या चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे.
एमएसआरडीसी अधीक्षक अभियंत्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११० किमीच्या हद्दीतील चोऱ्यांचे सत्र थांबविण्यासाठी पोलिस आयुक्त, अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. सोलापूर-धुळे महामार्गावरदेखील अशाच चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. एनएचएआयने याबाबत पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत.
बॅटऱ्या चोरीमुळे मार्गावर अंधार...
बॅटऱ्या चोरीस जात असल्याने महामार्गावर अंधार पडतो. २ लाखांची एक बॅटरी आहे. सोलार एनर्जी त्यात साठवली जाते. मेघा इंजिनिअरिंगकडे मार्गाची देखभाल व दुरुस्ती चार वर्षांसाठी आहे. त्यामुळे ते चोरीस गेलेले साहित्य बसवतात. परंतु ते पुन्हा चोरीस जाते. स्पीड किती असावी याचे फलक, लोखंडी बॅरिेकेट्स, रिफ्लेक्टर रेडियम ६० किमीपर्यंत चोरीस गेले आहेत. यामुळे अपघातांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.
कुठे होत आहेत चोऱ्या?
वैजापूर आणि गंगापूर परिसरातून गेलेल्या पट्ट्यात सर्वाधिक चोऱ्यांचे प्रमाण आहे. बेंदेवाडी ते सुराळा या पट्ट्यातील महामार्गावर बॉण्ड्री, साईड कंपाउंड वॉल, झाडे तोडणे, साहित्याची चोरी होत असल्याची तक्रार एमएसआरडीसीने पोलिस प्रशासनाकडे केली. तार कंपाउंड, झाडांना पाणी देण्यासाठी टाकलेली पाइपलाइन चोरीस जात आहे.
वाहनांवर दगडफेक
महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांवर दगडफेकीच्या घटना होत आहेत. मोटारसायकल, ट्रॅक्टरला प्रवेश नसताना ती वाहने येत आहेत. कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना धमकावले जात आहे. पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी एमएसआरडीसीने तक्रारीत केली आहे.
दीड टन संरक्षण जाळी चोरीला
काही महिन्यांपूर्वी लोखंडी संरक्षण जाळी दीड किमीपर्यंत चोरीला गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातून आलेल्या टेम्पोतून पाच ते सहा जण महामार्गावरील संरक्षण जाळी कापत होते. त्यातील संतोष वारे यास रात्री ११:४५ वाजेच्या सुमारास जाळी तोडताना गस्त पथकाने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यातही दिले.
कशी आहे मोडस ऑपरेंडी?.
१० ते २० रुपयांना मिळणारी हेक्सा ब्लेडने लोखंडी बॅरिकेट्स कापण्यात येतात. हॅण्ड कटरने तार तोडून ती गोळा करून एका टेम्पोमध्ये टाकली जाते. कंपाउंड वॉलच्या पलीकडे टेम्पो उभा असताे. सहा ते सात जणांची टोळी नियोजनबद्धरीत्या चोऱ्या करते. ज्यांनी भूसंपादनाचा कोट्यवधींचा मावेजा घेतला आहे, तेच समृद्धीच्या लगत सुरक्षा भिंत बांधण्यास विरोध करीत असून, जेथे गॅप्स आहेत, तेथूनच चोर आडमार्गाने येत असल्याची शक्यता एमएसआरडीसीने वर्तविली आहे.