एन १ परिसरात सव्वा दोन लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 03:15 PM2020-09-24T15:15:53+5:302020-09-24T15:16:33+5:30
सिडको एन १ परिसरातील सेंट झेविअर शाळेजवळील बंद बंगला फोडून चोरट्यांनी ४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख २९ हजार रूपये असा जवळपास सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला.
औरंगाबाद : सिडको एन १ परिसरातील सेंट झेविअर शाळेजवळील बंद बंगला फोडून चोरट्यांनी ४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख २९ हजार रूपये असा जवळपास सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी सकााळी ११: ३० वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात चोरांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बंगल्यात राहणारे प्रेमजी नॉर हे गुजराती कुटूंब दि. २२ रोजी सहकुटूंब गुजरातमधील त्यांच्या गावी गेले होते. बंगल्याला कुलूप पाहून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे लोखंडी ग्रीलचे कुलूप आणि लाकडी दरवाजा तोडला. कपाट उचकटून त्यातील १ तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ३ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या आणि २९ हजार रूपयांच्या रोख रकमेची चोरी केली. बुधवारी सकाळी प्रेमजी यांचे बंधू गणेश हिराजी नॉर हे प्रेमजी यांचे घर सुरक्षित आहे की नाही, हे पाहण्यासाठी आले असता, सदर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
याप्रकरणी गणेश यांनी नोंदविलेल्या तक्ररीवरून पोलिसांनी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, सहायक पोलीस उपनरिीक्षक चव्हाण, हवालदार शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या फुटेजची तपासणी सुरू केली असूून चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले असावेत, अशी शक्यताही पोलिसांनी वर्तविली.