शिऊरमध्ये दिवसाढवळ्या ६४ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:03 AM2021-09-15T04:03:57+5:302021-09-15T04:03:57+5:30
शिऊर : मागच्या दाराने प्रवेश करून घरात ठेवलेल्या दागिन्यांसह रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. ...
शिऊर : मागच्या दाराने प्रवेश करून घरात ठेवलेल्या दागिन्यांसह रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागातून ६४ हजारांची चोरी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची नोंद शिऊर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शिऊर येथील रामदास मच्छिंद्र जाधव हे मधला पाडा परिसरात राहतात. मंगळवारी सकाळी रामदास जाधव हे नेहमीप्रमाणे आठ वाजता स्वतःच्या मेडिकल दुकानात गेले. त्यांच्या नवीन घराचे काम चालू असल्याने मेडिकलमध्ये त्यांचा चुलतभाऊ पंकज जाधव हा आला. त्यास दुकानात थांबवून ते घराच्या बांधकामास पाणी मारण्यासाठी पत्नीसह निघून गेले. मुलीही शाळेत गेल्या होत्या. त्यानंतर दुपारी बारा वाजेच्या सुमारास जाधव हे परत राहत्या घरी आले असता, त्यांना घरात पर्स अस्ताव्यस्त पडलेली दिसून आली. मागच्या घराचा कडी कोयंडा तोडलेला होता. त्यांनी पैशाची पिशवी शोधली ती देखील दिसून आली नाही. घरात ठेवलेले सोन्याचे दागिनेदेखील लंपास झालेले होते. घरातील रोख तीस हजार व दोन सोन्याची पोत, चांदीचे पैंजण असे मिळून एकूण ६४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले. घडलेला हा प्रकार जाधव यांनी शिऊर पोलिसांना कळविला. ठाण्याचे सपोनि. नीलेश केळे, पोउपनि. अंकुश नागटिळक, अमोल कांबळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती यांनी घटनास्थळी भेट दिली.
---------
श्वानाने घेतला माग
श्वान पथकालादेखील पाचारण करण्यात आले. या पथकाने बाजारतळपर्यंत माग काढला. विठ्ठल मंदिर मार्गे, बाजार तळातून चोरटे पसार झाल्याचे दिसून आले आहे. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेविषयी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पुढील तपास पो. हे. कॉं. आर. आर. जाधव करीत आहेत.