वाळूज महानगरात चोरीचे सत्र सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 05:11 PM2019-09-10T17:11:22+5:302019-09-10T17:11:32+5:30
एका घरफोडीसह ३ टपऱ्या फोडल्या, हजारोचा मुद्देमाल लंपास
वाळूज महानगर : वाळूज महानगरात काही दिवसांपासून चोरीचे सत्र सुरुच आहे. सिडकोतील घर फोडल्याची घटना ताजी असताना चोरट्यांनी पुन्हा एका घरफोडीसह ३ टपºया फोडून हजारो रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.९) उघडकीस आली. चोरीच्या वाढत्या घटनामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
गोविंद नामदेव देवकते (रा. गट नं.१२, भगतसिंह नगर, वडगाव कोल्हाटी) हे गुरुवार ५ सप्टेंबर रोजी महालक्ष्मीच्या सणासाठी गावी गेले होते. यावेळी त्यांनी मित्र मेंगळे यांच्याकडे घराची चावी दिली होती. चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले.मेंगळे यांच्या पत्नी सविता या रविवारी देवकते यांच्या घरी गणपतीची आरती करण्यासाठी आल्या तेव्हा त्यांना घराचा कडी-कोंडा तुटलेला दिसला. माहिती मिळताच देवकते यांनी घरी धाव घेत पाहणी केली असता कपाटातील एक तोळ्याचे सोन्याचे मणी गायब असल्याचे दिसले. देवकते यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दुसºया घटनेत पंढरपूर तिरंगा चौकातील अशोक घोडके (रा. वडगाव), कांतीलाल खुटे (रा. बजाजनगर) व सतीश राजपूत (रा. रांजणगाव) या तिघांच्या टपऱ्यांचे कुलूप तोडून चोरट्यांनी जवळपास २० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. यात घोडके यांचा ८ ते ९ हजार, खुटे व राजपूत यांचा प्रत्येकी ५ ते ६ हजाराचा मुद्देमाल गायब झाला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी एका रांगेत चार टपºया आहेत. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.