उस्मानपुऱ्यात भरदुपारी चोरी; प्राध्यापकाचा फ्लॅट फोडून सोन्याचांदीचे दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:39 PM2020-12-23T17:39:04+5:302020-12-23T17:42:18+5:30
Theft, Crime news in Aurangabad फ्लॅटला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी दाराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला.
औरंगाबाद: उस्मानपुऱ्यातील प्राध्यापकाचा बंद फ्लॅट भरदुपारी फोडून चोरट्यानी सोन्या चांदीचे दांगिने आणि रोख ८ हजाराची रक्कम लंपास केली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, शासकीय तंत्रनिकेतन येथे विभागप्रमुख असलेले प्रा. राजू तुकाराम पचकोर हे उस्मानपुरा येथील अक्षय अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची पत्नी दिवाळीपासून गावी गेलेली आहे. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ :१५ वाजेच्या सुमारास ते फ्लॅटला कुलूप लावून तंत्रनिकेतनमध्ये गेले होते. त्यांच्या फ्लॅटला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी दाराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला. बेड रुममधील कपाट तोडून त्यातील सोन्याचे चार तोळ्याचे दागिने आणि रोख ८ हजार रुपये चोरून आरोपी पसार झाले.
दुपारी २ वाजेच्या सुमारास जेवण करण्यासाठी प्रा.पाचकोर हे घरी परतले तेव्हा त्यांना फ्लॅटचा कडीकोंडा तुटलेला दिसला. चोरट्यांनी घर फोडल्याचे दिसताच त्यांनी घटनेची माहिती उस्मानपुरा पोलिसाना कळविली. पोलीस आल्यावर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता बेडरुममधील कपाट फोडून चोरट्यांनी त्यातील ३.४ ग्रॅम चे कानातील झुंबर, १० ग्रॅम सोन्याची मण्याची पोत, ओम पत्ते २, रिंग, नथ, सोन्याच्या दोन अंगठ्या आणि रोख ८ हजार असा सुमारे चार तोळ्याचे दागिने, चांदीचे ताट, वाटी,प्लेट, अत्तरदाणी असा ऐवज चोरट्यानी पळविल्याचे त्यांना दिसले. याप्रकरणी त्यांनी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली.
आदल्या दिवशी वॉचमन गेला गावाला
अक्षय अपार्टमेंट मध्ये तळमजल्यावर गोपाल नावाच्या वॉचमन सहपरिवार राहतो. मात्र तो २१ डिसेंबर रोजी गावाला गेल्याचे त्यांना समजले. तर त्यांच्या समोरील फ्लॅटमधील रहिवासी कंपनीत नोकरी करतात ते रोज सकाळी कामावर जातात आणि सायंकाळी घरी परतत असतात. ही संधी साधून चोरट्यानी फ्लॅट फोडला. गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकाने घटनास्थळाची पहाणी केली.