देशहित होते त्यांचे अंतिम उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:00 AM2018-02-12T00:00:28+5:302018-02-12T00:00:41+5:30
महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस ही सगळी मंडळी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्त्वांवर विश्वास ठेवणारी होती. या सगळ्यांचे एकमेकांशी असलेले नाते अत्यंत सेंद्रिय होते. ही मंडळी कधीही वैयक्तिक कारणासाठी एकमेकांशी भांडली नाहीत. देशहित हे सगळ्यांचे अंतिम उद्दिष्ट होते, पण त्यासाठीचे मार्ग वेगळे असल्यामुळे त्यांच्यात मतभेद होते. या नेत्यांचे अंतरिक संबंध समजून न घेता विनाकारण त्यांची प्रतिमा संकुचित करण्याचे धारिष्ट्य करू नये, अशा शब्दांत विश्वंभर चौधरी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस ही सगळी मंडळी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्त्वांवर विश्वास ठेवणारी होती. या सगळ्यांचे एकमेकांशी असलेले नाते अत्यंत सेंद्रिय होते. ही मंडळी कधीही वैयक्तिक कारणासाठी एकमेकांशी भांडली नाहीत. देशहित हे सगळ्यांचे अंतिम उद्दिष्ट होते, पण त्यासाठीचे मार्ग वेगळे असल्यामुळे त्यांच्यात मतभेद होते. या नेत्यांचे अंतरिक संबंध समजून न घेता विनाकारण त्यांची प्रतिमा संकुचित करण्याचे धारिष्ट्य करू नये, अशा शब्दांत विश्वंभर चौधरी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
देवगिरी महाविद्यालयातर्फे रविवारपासून आयोजित फुले- शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेस सुरुवात झाली. याचे पहिले पुष्प गुंफताना चौधरी यांनी ‘राष्ट्रनेत्यांचे अंतरंग’ हा विषय उलगडला. यादरम्यान त्यांनी म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांच्या अंतरिक संबंधांवर प्रकाश टाकला. अॅड. शशिकुमार चौधरी अध्यक्षस्थानी होते. पंडितराव हर्षे, त्रिंबकभाऊ पाथ्रीकर यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी व्याख्यानमालेबद्दल माहिती दिली तर प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे यांनी प्रास्ताविक केले.
चौधरी पुढे म्हणाले की, या राष्ट्रनेत्यांची पिढी ही शिक्षणातून पुढे आलेली होती, ‘फ्लेक्स’मधून नव्हे. गांधी या सगळ्या नेत्यांना घेऊन पुढे जाणारे नेते होते. त्यामुळे ते एक मध्यवर्ती सूत्रधार होते. राज्यघटना या सगळ्या राष्ट्रनेत्यांना एकत्र आणणारा शेवटचा धागा होता. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून या नेत्यांबद्दल अत्यंत उद्वेगजनक बोलले जाते. या नेत्यांचा इतिहास, मतभेदांचे संदर्भ नीट समजून घेऊन या नेत्यांबाबत बोला, असे आवाहनही त्यांनी या माध्यमातून के ले. पं. नेहरूंची भूमिका मांडताना ते म्हणाले की, आपल्याकडच्या एका वर्गाला आधुनिकतेचे वावडे होते आणि नेहरू हे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि विज्ञानवादी होते, त्यामुळेच त्यांना प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांचा देशाप्रतीचा दानशूरपणा कधीही समोर न येता केवळ त्यांची श्रीमंती आणि अय्याशी व्यक्तिमत्त्वाच्या गप्पाच रंगवून सांगण्यात आल्या.
सुभाषचंद्र बोस आणि नेहरू यांचे हिटलरची मदत घेण्यावरून वाद होते. त्यांचे के वळ वितुष्टच समोर येते, मात्र सुभाषचंद्रांच्या निधनानंतर आझाद हिंद सेनेचे पुनर्वसन नेहरूंनीच केले ही गोष्ट सांगितली जात नाही.
आंबेडकर आणि गांधी हे एकमेकांना छेद न देणारे स्वतंत्र विचारप्रवाह होते. गांधीजींना आधी स्वातंत्र्य हवे होते तर आंबेडकरांना सामाजिक सुधारणा अगोदर पाहिजे होत्या, हा त्यांच्या वादाचा मुद्दा होता.
आज (दि. १२) या व्याख्यानमालेदरम्यान सायं. ५.३० वा. डॉ. मोहन आगाशे ‘दैनंदिन जीवनातील ताणतणाव : आरोग्य आणि कलाक्षेत्राचे योगदान’ या विषयावर भाष्य करणार आहेत.
बुद्धीपेक्षा पुतळ्याची उंची महत्त्वाची वाटू लागली
सरदार पटेलांविषयी बोलताना चौधरी म्हणाले की, सरदार पटेलांवर खूपच अन्याय झाला, असे आज बोलले जाते. आता तर त्यांचा सगळ्यात मोठा पुतळाही उभारण्यात येत आहे. चीनचे मेटल वापरून बनविण्यात येणारा हा पुतळा प्रत्यक्षात सरदार पटेलांनाही आवडेल की नाही माहीत नाही. पण बौद्धिक उंची संपली की पुतळ्याची उंचीच मोठी वाटते, असा टोलाही त्यांनी मारला.