...तर नायलॉन मांजा विकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:04 AM2021-01-04T04:04:26+5:302021-01-04T04:04:26+5:30
औरंगाबाद : नायलॉन, सिंथेटिक मांजा वापराविरोधी अभियानाअंतर्गत पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची शहरवासीयांना भावनिक आवाहन करीत कायद्याचे उल्लंघन ...
औरंगाबाद : नायलॉन, सिंथेटिक मांजा वापराविरोधी अभियानाअंतर्गत पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची शहरवासीयांना भावनिक आवाहन करीत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
क्रांती चौक येथे ‘पक्ष्यांना वाचवा नायलॉन मांजाचा वापर टाळा’ या जनजागृती अभियानात त्यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व शहरातील अभियानात नेहमी सक्रिय असणारे किशोर पाठक, डॉ. एस. बी. नाईकवाडे, बेरील संचिस, औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशन व सदस्यांसमोर नायलॉन मांजामुळे मनुष्य, पक्षी, प्राणी यांच्या जीविताला गंभीर हानी होते, याचे गांभीर्य सांगताना मांजामुळे नुकताच नाशिक येथे गळा कापून मरण पावलेल्या महिलेच्या गंभीर प्रसंगाची आठवण करून दिली. दरवर्षी संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर भारतात लहानांपासून थोर मंडळी पतंगबाजी करतात. त्याकरिता वापरण्यात येणाऱ्या नायलॉन / सिंथेटिक मांजामुळे निसर्गातील हजारो पक्षी व प्राणी यांना आपला जीव गमवावा लागतो. पर्यावरणपूरक जीवनचक्र चालवण्यासाठी पक्षी व प्राणी महत्त्वाची भूमिका निभावतात. त्या सुंदर पक्षाचा एक तर जीव जातो अथवा गंभीर जखमी होतात, हे अत्यंत वेदनादायक आहे. नायलॉन/ सिंथेटिक मांजाचा वापर व विक्री करू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. मांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला. या कार्यक्रमासाठी पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे व वाहतूक ) सुरेश वानखेडे, तसेच विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश आघाव, शिनगारे, तारे, सुरेंद्र माळाळे, देवकर तसेच सहायक पोलीस निरीक्षक बहुरे व पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह कर्मचारी तसेच औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनचे सदस्य मोनिका काळे, पुरबी बॅनर्जी, शमा कुरे, अजय राणा, अनुदीप
मस्के, यश रोकडे, मासुम सईद, रिमा सातदिवे, गार्गी बागूल, मंगल सोनवणे, तनुश्री सोनवणे, भालचंद्र सोनार, शिव सरकुंदे आदींची उपस्थिती होती.
(फोटो)