...तर चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध विधानसभा लढवणार : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 02:45 PM2019-09-17T14:45:56+5:302019-09-17T15:02:31+5:30
चंद्रकांत पाटील हे राधानगरी, कोल्हापूर शहर व चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार करीत आहेत.
औरंगाबाद : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना स्वत:चा मतदारसंघ नाही, त्यामुळे ते मतदारसंघाची चाचपणी करीत आहेत. ते जर ग्रामीण भागातील मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर मी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले.
चंद्रकांत पाटील हे राधानगरी, कोल्हापूर शहर व चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार करीत आहेत. त्याविषयी पत्रकारांनी राजू शेट्टी यांना विचारले असता त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली. तसेच ते जर ग्रामीण भागातून लढणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार असेही जाहीर केले. सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चाप्रसंगी माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. महापोर्टल बंद करून सर्व भरती एमपीएससीद्वारे सुरू करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. काही जिल्ह्यांत एक, दोन तर काही जिल्ह्यांत काहीच पदांची भरती नाही, अशा प्रकारे सरकारने युवकांची चेष्टाच केली आहे. हजारो पदे रिक्त असताना सरकार मेगा भरती का काढत नाही, असा सवाल शेट्टी यांनी केला.
‘महापोर्टल’मधून ‘महाव्यापमं’सारखे घोटाळे
महापोर्टलद्वारे नोकर भरतीमध्ये ‘महाव्यापमं’सारखे घोटाळ्याचे प्रकार होत असूनही, सरकारचा याद्वारे भरती करण्याचा अट्टहास का, यातील भ्रष्टाचाराच्या वाटण्या कोणाकोणापर्यंत, त्याचे भागीदार कोणकोण आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. हे घोटाळे करणारे भाजपचे लोक आहेत, त्यांना वाचविले जात आहे, असा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर निशाणा साधला.