...तर विमा कंपन्यांच्या स्वतंत्र पंचनाम्यांना लागणार वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 05:46 PM2019-11-20T17:46:31+5:302019-11-20T17:50:40+5:30
विमा कंपनी प्रतिनिधींच्या बैठकीत विभागीय आयुक्तांनी केली कानउघाडणी
औरंगाबाद : मराठवाड्यातील ४४ लाख ३३ हजार ५४९ शेतकऱ्यांच्या हाती आलेला खरीप हंगाम आॅक्टोबरच्या उत्तरार्धानंतर आणि नोव्हेंबर महिन्यातील पूर्वार्धात झालेल्या पावसाने हिरावून नेला. विमा कंपन्या शेतकऱ्यांची परवड करीत असून, स्वतंत्र पंचनामे करण्याची भूमिका काही कंपन्यांनी घेतली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विमा कंपनी प्रतिनिधींची याप्रकरणी कानउघाडणी केली आहे. दिवसाकाठी ३ ते ४ हजार पंचनामे कंपन्यांकडून होत असतील वर्षभर कंपन्यांना पंचनामे करण्यास जातील, तोपर्यंत शेतकऱ्यांनी कंपन्यांचे उंबरठे झिजवायचे काय? अशा शब्दात विमा कंपन्यांना आयुक्तांनी झापले. प्रशासकीय पंचनाम्यांच्या आधारे तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी विमा कंपन्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विभागीय प्रशासनाने केलेले पीक नुकसानीचे पंचनामे गृहीत धरून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मोबदल्याची तरतूद करण्यास तरी नकार दिल्याची माहिती समोर आल्यानंतर आयुक्तांनी सहा शासकीय आणि दोन खाजगी विमा कंपन्यांची गेल्या आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला. हिंगोली आणि जालना जिल्ह्यात बजाज अलियान्झ कंपनीने पीकविमा काढला आहे. विमा कंपन्यांची अरेरावी वाढल्याचे आयुक्तांच्या आढावा बैठकीत निदर्शनास आले. शेतकरी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना मदत करीत नसल्याचा आरोप काही कंपन्या करीत आहेत.
यावर विभागीय आयुक्तांनी प्रशासकीय पंचनाम्यांचा आधार घेऊन तातडीने मोबदल्याचा निर्णय घेण्याचे आदेश दिले. २२ लाख हेक्टरवरील नुकसानीचा सुरुवातीचा अंदाज आयुक्तांनी सूक्ष्म नियोजन करून केलेल्या पाहणीमुळे फोल ठरला. ४१ लाख ४० हजार १७५ हेक्टरवरील खरीप हंगामाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना या आधारेच मोबदला द्यावा लागेल. विमा कंपन्यांचे दावे पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या हाती मदत मिळण्यास थोडा विलंब होणार आहे. रबी पेरण्यांच्या काळात विम्याची रक्कम मिळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार
विभागीय प्रशासनाने परतीच्या व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून २९०४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई विभागाला लागेल, असा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार केंद्रीय पथक पाहणीसाठी विभागात येईल. पथक येईपर्यंत शेतात नुकसानीचे दृृश्य नसेल, त्यासाठी प्रशासनाने आताच छायाचित्रे, व्हिडिओ शूटिंग करून ठेवले आहे. विमा कंपन्या ऐनवेळी नाटकं करतील, त्यासाठी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी खबरदारी घेत पूर्ण तपशील तयार करून ठेवण्याच्या सूचना यंत्रणेला केल्या आहेत.