...तर मराठी घरापुरतीच मर्यादित राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:02 AM2021-02-15T04:02:01+5:302021-02-15T04:02:01+5:30
डॉ. रसाळ यांना नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्त संडे क्लबतर्फे दि. १४ रोजी राजहंस ...
डॉ. रसाळ यांना नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्त संडे क्लबतर्फे दि. १४ रोजी राजहंस प्रकाशन कार्यालयात विशेष सत्कार साेहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते डॉ. रसाळ यांचा सत्कार झाला.
यावेळी बोलताना डॉ. रसाळ म्हणाले की, शासनाचे पुरस्कार हे शिफारशीने दिले जातात, असे बोलले जाते. त्यामुळे साहित्य संस्थांकडून मिळालेल्या पुरस्कारांचा आनंद आणि शासनाच्या पुरस्कारांचा आनंद निश्चितच वेगळा असतो.
मराठी भाषकांविषयी बोलताना ते म्हणाले की, हिंदी- इंग्रजी बोलता येत नाही, याची आपल्याला लाज वाटते. तसेच सगळीकडे मराठी बोललो तर मागासलेले वाटू याचीही धास्ती असते. आम्ही कमी प्रतीचे आहोत, हे आम्ही स्वत:च ठरवून टाकले आहे. प्रत्येक प्रांतात तेथील स्थानिक भाषा बोलणे अनिवार्य असते. परंतु मराठीचा एकही शब्द न शिकता वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहणारी अनेक अमराठी माणसे दिसतात. महाराष्ट्राशिवाय इतरत्र कुठेच अशी परिस्थिती नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मराठीच्या बाबतीत सातारा, सांगली आणि कोल्हापुरात चांगली परिस्थिती आहे, असेही त्यांनी नमूद केले.
न्या. नरेंद्र चपळगाकवर, श्याम देशपांडे, छाया महाजन, डॉ. भगवान महाजन यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
चौकट :
‘अखेरचा शब्द’
गुरुवर्य रसाळ सर हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहे, अशा भावना ठाले पाटील यांनी व्यक्त केल्या. आम्ही केवळ मराठीचे जाणकार आहोत; पण भाषाविषयक एखादा संभ्रम निर्माण झाल्यास गुरुवर्य रसाळ हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच ‘अखेरचा शब्द’ आहेत, अशा भाषेत त्यांनी डॉ. रसाळ यांचा गौरव केला. केवळ शासनाच्या पुरस्काराच्या नियमावलीत न बसल्यामुळे डॉ. रसाळ यांच्यासारख्या समीक्षकाला मोठ्या पुरस्कारापासून वंचित रहावे लागले आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.