...तर वैद्यकीय अधिकाऱ्याची नोंदणी होणार रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:10 PM2018-09-04T13:10:56+5:302018-09-04T13:11:47+5:30
उपचाराअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्याचा आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (एमएमसी) त्याची नोंदणी रद्द करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबाद : शासकीय आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांत विनापरवानगी गैरहजर राहिल्याने उपचाराअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्याचा आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (एमएमसी) त्याची नोंदणी रद्द करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधी तुवड्यासंदर्भात १६ जुलै रोजी विधान परिषदेत चर्चा झाली. त्यावेळी चर्चेत आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीने उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे ज्या आरोग्य केंद्रात कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे उपचाराअभावी रुग्णाचा, प्रसूतीदरम्यान मातेचा, बाळाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करून ‘एमएमसी’कडे नोंदणी रद्द करण्यासाठी शिफारस करण्यात येईल, तसेच पूर्वपरवानगी, सबळ कारणाशिवाय कर्तव्यात कसूर करणाऱ्या, कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला. पूर्वपरवानगी अथवा सबळ कारणाशिवाय कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करून वेतनवाढ रोखण्याचाही निर्णय घेण्यात आला.