...तर मंदिरात आत्मदहन करणार; पालखीस परवानगी नाकारल्याने ज्ञानेश्वर महाराजांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 06:02 PM2021-07-06T18:02:24+5:302021-07-06T18:04:33+5:30
Ashadhi ekadashi : 'याबाबत लवकर निर्णय घ्यावा, प्रशासनाने मला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर मी मंदिरात पेटवून घेईल'
पैठण (औरंगाबाद ) : संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या मातापित्यांच्या पालखीस परवानगी नाकारल्याने आपेगाव मंदिराचे अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी मंदिरातच आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे. 'याबाबत लवकर निर्णय घ्यावा, प्रशासनाने मला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर मी मंदिरात पेटवून घेईल', अशी टोकाची भूमिका ज्ञानेश्वर महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत घोषित केली. यामुळे वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी असलेल्या आपेगाव ता. पैठण येथून पंढरपूर आषाढी वारीची गेल्या ८४२ वर्षांपासून परंपरा चालत आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा गतवर्षी खंडीत झाली. या वर्षी मात्र राज्य शासनाने मानाच्या दिंडीसहीत आणखी दोन दिंड्यांना पंढरपूर वारीसाठी परवानगी दिली. मात्र, राज्य शासनाने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मभूमितून निघणाऱ्या पालखीस परवानगी नाकारली. यावर मंगळवारी आपेगाव येथे पत्रकार परिषदेत हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी भूमिका मांडली.
यावेळी हभप शिवाजी महाराज सेलूकर, रामचंद्र औटे, भाऊसाहेब औटे, अण्णासाहेब औटे व वारकरी उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वर महाराज यांनी मोजक्या पालखी सोहळ्यास परवानगी देताना राज्य सरकारने कोणते निकष लावले असा प्रश्न उपस्थित केला. वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला अशा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मभूमितून निघणाऱ्या पालखीस परवानगी नाकारल्याने संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. आपेगाव येथून निघणाऱ्या पालखीची नोंद शासकीय गँझेट मध्ये आहे. पालखीस परवानगी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला. परंतु, याबाबत दखल घेण्यात आली नसल्याने वारकऱ्यासह आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या सोबत १८ जिल्ह्यातील वारकरी आत्मदहनाचा मार्ग स्विकारणार असल्याचे ही ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले. परवानगीसाठी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. परवानगी मिळाली नाही तर दि. १२ जुलै रोजी आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदीरात वारकऱ्यासह आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
या आहेत मागण्या...
पायी वारीचे आम्ही समर्थन करीत नाहीत. २५ वारकऱ्यासह वाहनाने पंढरपूरला जाण्याची परवानगी द्या.
पंढरपूर प्रवेश व प्रदक्षिणा नाकारली तरी चालेल, चंद्रभागेत स्नान करून आम्ही परत फिरू.
२ जुलै रोजी झाले औपचारिक प्रस्थान....
संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या माता पिता पालखीचे आपेगाव येथून दि २ जुलै रोजी पंढरपूर वारीसाठी औपचारिक प्रस्थान झाले असून पालखी आपेगाव येथील मंदीरात मुक्कामी आहे. राज्य शासनाने परवानगी दिली तर पालखी दि. १८ रोजी मोजक्या वारकऱ्यासह वाहनाने पंढरपूरकडे रवाना होईल. परंतु, राज्य सरकारने निर्णय १२ जुलैच्या आत घोषित करावा.
राज्य शासनाने परवानगी दिलेल्या दहा पालख्या....
संत एकनाथ महाराज ( पैठण, औरंगाबाद ), संत निवृत्ती महाराज ( त्र्यंबकेश्वर, नाशिक ), संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड, पुणे ), संत सोपानदेव महाराज ( सासवड, पुणे ), संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर, जळगाव ), रुक्मिणी माता ( कौडन्यपूर, अमरावती ), संत तुकाराम महाराज ( देहू, पुणे ), संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी, पुणे ), संत नामदेव महाराज ( पंढरपूर, सोलापूर ) व संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर,अहमदनगर ) या संस्थानच्या पालखी सोहळ्यास यंदा राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तसेच सासवड व अमरावती संस्थानच्या पालखीस परवानगी देण्यात आली आहे.