...तर स्वराज्य संघटना राजकारणात येणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 03:33 PM2022-08-21T15:33:54+5:302022-08-21T15:35:03+5:30
पैठण येथील अभिनंदन मंगल कार्यालयात शनिवारी छावा क्रांतीवीर संघटनेचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले.
पैठण- मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली गेली, तर स्वराज्य संघटना राजकारणात जाणार नाही अन्यथा आम्हाला तसा निर्णय घ्यावा लागेल, अशा स्पष्ट शब्दात छत्रपती संभाजे राजे यांनी पैठण येथील छावा क्रांतीवीर सेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना सरकारला ईशारा दिला.
पैठण येथील अभिनंदन मंगल कार्यालयात शनिवारी छावा क्रांतीवीर संघटनेचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीराजे व प पु १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवाजी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, माजी आमदार संजय वाघचौरे, अभिजित राणे, रामेश्वर बावणे, अनिल राऊत, भगवान सोरमारे, गंगाधर औताडे, सागर बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी करण गायकर यांनी मराठा आरक्षण व समाजाचे मुलभूत प्रश्न अधिवेशनात मांडले हाच धागा पकडत छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा समाज सामाजिक मागासलेला आहे हे सिध्द करावे लागेल व यासाठी मराठा समाज मागास आयोगाचे गठण सरकारने करावे असे आवाहन केले. मराठा आरक्षणाची कार्यवाही परत करावी लागणार आहे असेही ते यावेळी म्हणाले.
मला तुमची साथ हवी
स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील काळात स्वराज्य संघटना वाटचाल करणार आहे. त्यासाठी तुमची साथ मला हवी आहे. असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. दरम्यान राष्ट्रीय अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात येऊन त्या संदर्भात पुढील दिशा धोरणे ठरविण्यात आली. अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने छावा क्रांतीवीर संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे व तात्काळ मागास आयोगाची स्थापना करावी असे आवाहन या अधिवेशनात राज्य सरकारला छत्रपती संभाजीराजे यांनी केले असून यासाठी तातडीने बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली.