...तर माझ्या मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असेल; संतप्त एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा, व्हिडिओ व्हायरल
By सुमेध उघडे | Published: February 23, 2021 05:51 PM2021-02-23T17:51:17+5:302021-02-23T17:54:33+5:30
ST employee's suicide warning to State Government पांचाळ किरण अनिरुद्ध असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते औरंगाबाद येथील सिडको बस स्थानकामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत.
औरंगाबाद : मुंबई येथे नियुक्तीदरम्यान कोरोना झाल्यानंतर एका एसटी कर्मचाऱ्यास रुजू झाल्यानंतर लागलीच पुन्हा एकदा मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्याने थेट आत्महत्येची धमकी दिली आहे. हा कर्मचारी शहरातील सिडको बसस्थानकात वाहक म्हणून कार्यरत आहे. त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून, माझी कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा मुंबईत जाण्याची मानसिकता नाही . वरिष्ठ माझे ऐकत नाहीत. याची दखल घेतली नाही तर मी आत्मदहन करेल, माझ्या मृत्यूला शिवसेना आणि हे सरकार जबाबदार असेल असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
पांचाळ किरण अनिरुद्ध असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते औरंगाबाद येथील सिडको बस स्थानकामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, जानेवारी महिन्यात ते मुंबई येथे नियुक्तीवर होते. त्यानंतर परत आल्यास त्यांना कोरोनाचे निदान झाले. उपचारानंतर ते १७ फेब्रुवारीस परत नोकरीवर जॉईन झाले. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा मुंबई येथे नियुक्ती देण्यात आल्याचे कार्यालयाने सांगितले. मात्र, कोरोना आजारपणामधून बरे झाल्यानंतर लागलीच पुन्हा मुंबई येथे काम करण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी आपली नियुक्ती रद्द करावी अशी विनंती वरिष्ठांना केली. परंतु, वरिष्ठांनी त्यांना मुंबईला जावेच लागेल असे सांगितले. यामुळे संतापलेल्या पांचाळ यांनी व्हिडिओद्वारे माझा मृत्यू झाला तर याला शिवसेना आणि सरकार जबाबदार असेल. माझी नियुक्ती रद्द झाली नाही तर मी आत्मदहन करेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.
मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असेल
किरण पांचाळे यांच्या व्हायरल व्हिडिओ ते मी शिवसेनेच्या विचारांशी प्रभावित आहे. माझे वडील शिवसेनेचे काम करतात. मात्र, माझी मानसिकता नसताना मला पुन्हा मुंबईला नियुक्ती करण्यात येत आहे. ती रद्द करावी यासाठी माझी कोणीच मदत करत नाही असे म्हटले आहे. 'मला विश्वास आहे माझ्या ठाकरे सरकारवर ते मला न्याय देतील. मी खैरनार साहेब यांना दहा वेळा विनंती केली की, मला जायचे नाही. याची जर दखल घेतली नाही तर याला शिवसेना आणि आपले जे सरकार आहे ते जबाबदार राहील' असे ही म्हटले आहे.