...तर संवेदनशील औरंगाबाद हा शिक्का पुसला जाईल; पोलीस आयुक्तांकडून नागरिकांचे कौतुक
By राम शिनगारे | Published: September 19, 2022 08:31 PM2022-09-19T20:31:22+5:302022-09-19T20:38:53+5:30
यावर्षीच्या मिरवणुकीत एकही डीजे वाजविण्यात आला नाही. वेळेत मिरवणूक सुरू केली. मध्यरात्री १२ वाजता सर्व मंडळांनी वाद्य बंद केले. हे औरंगाबादसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी उदाहरण ठरले आहे.
औरंगाबाद : शहरात ११ दिवस मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यात पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन गणेश मंडळांनी काटेकोरपणे केले. त्यामुळे उत्सव काळात अदखलपात्रसुद्धा गुन्हा नोंदविण्याची वेळ पोलिसांवर आली नाही. औरंगाबाद शहर संवेदनशील असल्याचा ठपका नेहमीच ठेवला जातो. मात्र, नागरिकांनी गणेशोत्सवासारखाच प्रत्येक उत्सव शांततेत साजरा केल्यास संवेदनशीलतेचा ठपका लोक विसरून जातील, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केले.
शहर पोलीस आयुक्तालयातर्फे गणेशोत्सवात उत्तम काम केल्याबद्दल आभार आणि कौतुक सोहळ्याचे आयोजन संत एकनाथ रंगमंदिर येथे सोमवारी सायंकाळी केले होते. या सोहळ्याला पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, सार्वजनिक गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, चालू वर्षाचे अध्यक्ष विजय औताडे, पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, अपर्णा गिते, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नवीन औरंगाबाद गणेश महासंघाचे अध्यक्ष बबन डिडोरे पाटील, सिडको-हडको महासंघाचे सागर शेलार, छावणी महासंघाचे अशोक आम्ले, वाळूज महासंघाचे बबन गायकवाड, हर्षवर्धन कराड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आयुक्त गुप्ता म्हणाले, यावर्षीच्या मिरवणुकीत एकही डीजे वाजविण्यात आला नाही. वेळेत मिरवणूक सुरू केली. मध्यरात्री १२ वाजता सर्व मंडळांनी वाद्य बंद केले. हे औरंगाबादसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी उदाहरण ठरले आहे. नागरिकांनी एकदा ठरवले की, कोणतीही गोष्ट शक्य नाही, हेच या गणेशोत्सवातुन दाखवून दिल्याचेही गुप्ता म्हणाले. प्रास्ताविक उपायुक्त अपर्णा गिते यांनी केले. सूत्रसंचालन गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले. उस्मानपुरा ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी आभार मानले.
'लोकमत'च्या ‘कुजबुज’ची चर्चा
'लोकमत'मध्ये 'नियोजनामुळे गणेशोत्सव निर्विघ्न' अशा आशयाची कुजबुज महोत्सवानंतर प्रकाशित केली होती. या ‘कुजबुज’चा संदर्भ देत माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यातील शब्द ना शब्द प्रत्यक्षात आम्ही अनुभवला असल्याचे सांगितले. तेव्हा ‘लोकमत’च्या ‘कुजबुज’ची कार्यक्रमस्थळी चर्चा सुरु झाल्याचेही पाहायला मिळाले.