सोयगाव तालुक्यातील ५९ शाळा खडूविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:52 PM2018-12-07T23:52:51+5:302018-12-07T23:53:07+5:30
अनुदानात अचानक घट : प्राथमिक शिक्षणाची लागली वाट
सोयगाव : संयुक्त शाळा व्यवस्थापन अनुदानात अचानक घट झाल्याने जि.प. शाळांना खडू खरेदीसाठी रक्कम नसल्याने ५९ शाळांमध्ये ज्ञानार्जनाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारापाठोपाठ शाळेतील खडू संपल्याने तालुक्यात प्राथमिक शिक्षणाची वाट लागली आहे.
गेल्या चार दिवसांपासून ‘विनाखडू’ शाळा सुरु आहे. खडू नसल्याने शिक्षक तोंडी शिकवणीवर विद्यार्थ्यांना धडे देत आहेत.
तालुक्यात जि.प.च्या ९४ आणि खाजगी संस्थांच्या २२ शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविण्याचे काम चालते. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गांसाठी शासनाकडून संयुक्त शाळा व्यवस्थापन अनुदान मिळते; परंतु या अनुदानात शासनाने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार निकष ठरविल्याने अनुदानाचा निधी कमी पडत आहे. या अनुदानाच्या निधीत शैक्षणिक साहित्य, शाळांची किरकोळ दुरुस्ती, भौतिक गरजांसह विविध कामे करण्याच्या सूचना असताना खडू खरेदीसाठी काही शाळांना हा निधी तोकडा पडत आहे.
विशेष म्हणजे या निधीचा वर्षभर उपयोग करून मार्चअखेरीस उपयोगिता प्रमाणपत्रही सादर करण्याचे आदेश आहेत. १०० ते २५० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांना १५ हजार, २५० ते त्यापेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना २० हजार आणि शंभरच्या आत विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांना केवळ १० हजार रुपये मिळतात. या शाळा व्यवस्थापन निधीवरच वर्ष काढताना शाळांच्या नाकीनऊ येते.
५९ शाळांचा १० हजार अनुदानात समावेश असल्याने या शाळांना खडू खरेदीसाठी पैसाच नसल्याने सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी कसरत करावी लागत आहे. खडूच उपलब्ध नसल्याने शिक्षकांना हात धरून वर्गात बसावे लागते. त्यामध्येही काही शाळांना डस्टरही मिळत नसल्याची माहिती हाती आली आहे.
अनुदाननिहाय शाळांची संख्या
अनुदान (रुपये) शाळा संख्या
२० हजार १२ शाळा
१५ हजार २१ शाळा
१० हजार ५९ शाळा
कोट
सोयगाव तालुक्यात दोन माध्यमिक शाळा सोडल्यास ९२ शाळांना ११ लाख ६५ हजार रुपये संयुक्त शाळा अनुदान समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे; परंतु वर्ष काढण्यासाठी पटसंख्या कमी असलेल्या ५९ शाळांना ही रक्कम पुरेशी नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित शाळांच्या व्यवस्थापन समितींनी बैठकीत निधीची वाढीव मागणी केली आहे. याबाबत जि.प.कडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
-राजेंद्र फुसे,
शिक्षणविस्तार अधिकारी