रुग्णालयांत रुग्णांसाठी बेड नाही, कोविड केअर सेंटर मात्र रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:02 AM2021-04-19T04:02:06+5:302021-04-19T04:02:06+5:30
औरंगाबाद : सर, रुग्ण गंभीर आहे, प्लीज एखादा बेड रिकामा आहे का? असा संवाद शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या ...
औरंगाबाद : सर, रुग्ण गंभीर आहे, प्लीज एखादा बेड रिकामा आहे का? असा संवाद शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बहुतांश रुग्णालयांत ऐकण्यास मिळत आहे. शहरात रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी सहजासहजी बेड मिळत नसल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. दुसरीकडे कोविड केअर सेंटरमधील शेकडो खाटा रोज रुग्णांविना रिकाम्या राहात आहेत. सौम्य लक्षणे असलेले रुग्णही रुग्णालयात भरती होत असल्याने शहराची स्थिती चिंताजनक बनली आहे.
कोरोनाची लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी कोविड केअर सेंटरची व्यवस्था उभारण्यात आली. परंतु रुग्णालयात गेलो तर लवकर बरे होऊ, कोविड सेंटरमध्ये भरती झालो आणि ऑक्सिजन लागला तर, आरोग्य विमा आहे, खर्चाची पर्वा नाही, अशा विचाराने फारसा त्रास नसलेले रुग्णही रुग्णालयांत भरती होत आहेत. त्याबरोबर ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. त्यामुळे रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत. ऑक्सिजन, आयसीयू , व्हेंटिलेटर बेड रुग्णांना मिळणेही अवघड झाले आहे. त्याउलट कोविड केअर सेंटर रिकामे राहात आहे. त्यामुळे हे सेंटरदेखील आता गंभीर रुग्णांच्या उपचाराच्या दृष्टीने सज्ज करण्याची आवश्यकता आहे. किमान ऑक्सिजन बेड तरी करण्याची गरज असल्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली.
------
कोविडग्रस्तांवर उपचार करणारी रुग्णालये - ६९
------
सामान्य बेड
एकूण बेड-७,८०९
रिकामे बेड-२,४१८
ऑक्सिजन बेड-२,१४४
रिकामे ऑक्सिजन बेड-४४८
--------
कोविड सेंटर-१७
एकूण बेड-३०८७
रिकामे बेड-१२९६
-------
कोविड सेंटरमधील ४१ टक्के बेड रिक्त
काेरोनाच्या सर्वसाधारण रुग्णांसाठी ग्रामीण भागांत आणि शहरात कोविड केअर सेंटर तयार केलेले आहे. आजघडीला येथील ४२ टक्के बेड रिकामे आहेत. ३ हजार बेडपैकी पंधराशे बेड रिकामे आहेत. होम आयसोलेशनमध्ये २ हजार ४२७ रुग्ण आहेत. कोविड सेंटरपेक्षा घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
----
घाटी रुग्णालयामध्ये दाखल
७५ रुग्णांची प्रकृती सामान्य
घाटीत कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात. आजघडीला याठिकाणी ६१७ कोरोना रुग्ण दाखल आहेत. यातील तब्बल ५४२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर ७५ रुग्णांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली.
----
लक्षणे नसलेले रुग्ण होम आयसोलेशनमध्ये थांबत आहेत. तर लक्षणे असलेले, गंभीर रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होत आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरमधील बेड रिकामे राहात आहेत. कोविड केअर सेंटरचे जवळपास ५० टक्के बेड रिक्त आहेत.
-डाॅ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा