्रफासेपारधी, मुले पळविणारी टोळी नाही
By Admin | Published: August 9, 2015 12:22 AM2015-08-09T00:22:19+5:302015-08-09T00:27:36+5:30
उस्मानाबाद : ढोकीसह कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरात फासे पारधी आल्याची तर काही भागात लहान मुलांना पळविणाऱ्या टोळ्या सक्रीय
उस्मानाबाद : ढोकीसह कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरात फासे पारधी आल्याची तर काही भागात लहान मुलांना पळविणाऱ्या टोळ्या सक्रीय असल्याच्या बातम्या सोशल मिडियावर पसरविल्या जात आहेत. यामध्ये कसल्याही प्रकारचे तथ्य नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी केले आहे़
मागील चार दिवसांत सोशल मिडियामध्ये मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागात तीन हजार फासे पारधी उतरल्याची अफवा पसरविली जात आहे. सदर टोळीकडून दरोडे टाकून माल लुटला जात आहे. तसेच लहान मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न होत असल्याचा मॅसेज मोबाईलवरुन फिरत आहे. मोबाईलवरील या बातमीसोबत काही फोटोही अपलोड केले जात आहेत. या प्रकारामुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. सद्यस्थितीत पावसाअभावी जिल्हा तीव्र दुष्काळाचा सामना करीत आहे. त्यात अशा अफवा पसरल्याने सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्रिमुखे यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)
शिराढोण परिसरात नागरिकांनी काढली रात्र जागून
मोबाईलवरुन चुकीच्या अफवा पसरविल्या गेल्याने पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास सोसावा लागतो. याचा प्रत्यय शनिवारी शिराढोण परिसरात आला. येथील सहा गावांत वरील प्रकारची अफवा पसरल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली. नायगाव, पाडोळी, बोरगाव (खु), पिंपरी, रायगव्हाण व जायफळ या गावांत हा प्रकार घडला. पोलिसांसह नागरिकांनीही रात्रभर गस्त घातली. मात्र एकही संशयित व्यक्ती न आढळल्याने ही अफवा असल्याचे उघड झाले. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नागरिकांनी मोबाईलवर पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे शिराढोणच सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी कळविले आहे़