शहरात दिसत नाहीत कावळे अन् गाईला खाऊ देत नाहीत; पूर्वजांच्या नावाचे पिंड कोणाला द्यावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 04:51 PM2024-09-23T16:51:40+5:302024-09-23T16:51:55+5:30
पितृपक्ष असो वा श्राद्ध या काळात कावळ्यालाच का घास खाऊ घालतात? जाणून घ्या
छत्रपती संभाजीनगर : शहरात कावळे दुर्मीळ झाल्याने पूर्वजांच्या नावाने तयार केलेले पिंड कोणाला खाऊ घालायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कावळे दिसेनासे झालेत आणि ते पिंड गाईला खाऊ घालू देत नाहीत. यामुळे सर्वांची पंचाईत झाली आहे.
पितृपक्ष पंधरवड्याला बुधवारपासून सुरुवात झाली. आपल्या पूर्वजांना पितृपक्षात जेवणाचे आमंत्रण दिले जाते. पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी तांदळाच्या भाताचे पिंड तयार करण्यात येते. त्यातील वैश्व देवाचा उरलेला भात (काकबली) कावळ्याला खाण्यासाठी दिला जातो. मात्र, शहरात कावळे नसल्याने पिंड गच्चीवर ठेवले जाते. मग त्यास अन्य पक्षी खातात. दुसरे पूर्वजांच्या नावाने तयार केलेले पिंड अनेकजण गाईला खाऊ घालतात. त्यामुळे गाईचे पोट खराब होते. त्या ऐवजी ते पिंड पाण्यात टाकावे. जलचर प्राणी ते खातात.
ब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष विश्वास नागापूरकर गुरूजी यांनी सांगितले की, पर्याय म्हणून पूर्वजांच्या नावाचे पिंड घराच्या अंगणात जेथे रोप लावले आहे तेथे मातीत खड्डे खोदून त्यात ठेवावे व त्यावर माती टाकावी. ते मुंग्यांसारखे सूक्ष्म जीव खाऊन टाकतील.
दीड हजार पुरोहित करतात श्राद्धपक्ष
आजघडीला शहरात ३००० पुरोहित आहेत. त्यातील सुमारे दीड हजार पुरोहित श्राद्धपक्षाचा विधी करतात. जेवणासाठी एक किंवा दोन ब्राह्मण सोबत नेतात. पितृपक्ष पंधरवड्यात जेवणारे फार कमी असतात. यामुळे नोकरी करणारे किंवा सेवानिवृत्त झालेल्या ब्राह्मणांना न्यावे लागते.
कावळ्यालाच घास का?
पितृपक्ष असो वा श्राद्ध या काळात कावळ्यालाच का घास खाऊ घालतात? यासंदर्भात नागापूरकर गुरुजी यांनी सांगितले की, वड व पिंपळ २४ तास शुद्ध हवा देणारे वृक्ष आहेत. या दोन्ही झाडांना जे अंकुर येतात ते कावळे खातात. त्या फळांचे मिश्रण पोटात तयार होऊन जी विष्टा तयार होते त्या विष्टेपासून वड, पिंपळ वृक्ष जमिनीत तयार होतात. हे केवळ कावळाच करू शकतो. पितृपक्ष हा कावळा मादींचा प्रजनन काळ आहे. म्हणून त्या मादीस चांगले पदार्थ खाण्यास मिळावे व पुढे कावळ्यांचा वंश वाढावा म्हणून त्यांना नैवेद्य देण्यात येतो.