शरीरात सोळा शत्रू आहेत, त्यांच्यावर मात करा, यासाठी देवाला शरण जा: इंदोरीकर महाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 12:04 PM2023-11-21T12:04:40+5:302023-11-21T12:06:13+5:30
राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त रंगले कीर्तन : देव्हाऱ्यात ज्ञानेश्वरी ठेवा, महिलांना आवाहन
छत्रपती संभाजीनगर : ‘शत्रू कधीच बाहेरचे नसतात. ते घरात, भावकीत, गावातच असतात. तुमची प्रगती व्हायला लागली की लोक जळणारच! पण याहीपेक्षा प्रत्येकाच्या शरीरात सोळा शत्रू आहेत. त्यांच्यावर मात करा. यासाठी देवाला शरण जा’, असा संदेश प्रख्यात प्रबोधनकार - कीर्तनकार हभप निवृत्ती देशमुख- इंदोरीकर महाराजांनी सोमवारी दिला.
राज्याचे माजी उद्योग- शालेय शिक्षणमंत्री व लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त कारगिल मैदानावर आयोजित इंदोरीकर महाराजांचे कीर्तन रात्रीचे १० वाजले तरी संपूच नये असेच भाविकांना वाटत होते. इतकी एकाग्रता वाढली होती. विविध ज्वलंत प्रश्नांवर बोट ठेवत मार्मिक टिप्पणी करावी ती इंदोरीकर महाराजांनीच! त्याची प्रचिती सोमवारीही आली. राजेंद्र दर्डा यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त महिलांनी देव्हाऱ्यात ज्ञानेश्वरी ठेवावी, असे आवाहन करीत महाराज म्हणाले, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरीचा स्पर्शही कल्याण करतो. पंधरा वर्षांच्या मुलाने लिहिलेला हा ग्रंथ वाचणारा पंडित होऊन जातो.
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, मीपणा, आशा, इच्छा, वासना, तृष्णा अशा एकेक या शत्रूंची यादी मोजत, त्याबद्दलचे सुंदर विश्लेषण करीत व त्याहीपेक्षा त्याची मनाला भिडणारी उदाहारणे देत महाराजांनी आपले कीर्तन खुलवले, रंगवले, उपस्थितांना पोट भरून हसवले. या चार वर्षांत अल्पवयीन मुली पळून जाऊन लग्न करण्याचे व दारूमुळे मृत्यूचे प्रमाण कसे वाढत गेले, हे रंजक पद्धतीने सांगताना इंदोरीकर महाराज भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांतून आसवे येऊ लागली.
माझं लग्न वीस रुपयांत झालेले आहे. लग्नाच्या दिवशीही मी दोन कीर्तने केलेली होती. आजही गावोगाव फिरतो. कीर्तनातून प्रबोधन करतो आणि शिव्या खातो. शिव्या खाण्यासाठीच जणू माझा जन्म झाला. पण वास्तव आपल्या लोकांना नाही तर कुणाला सांगावे, असा प्रश्न उपस्थित करीत इंदोरीकर महाराजांनी, लग्नावर कमी खर्च करा. कमी लोक बोलवा. प्रिवेडिंग पद्धत बंद करा. आपली संस्कृती जपा, असे आवाहन केले.
यंदा शेतकऱ्यांची दिवाळी झाली नाही, शहरात ते जाणवत नाही, याबद्दलची खंतही महाराजांनी व्यक्त केली. बूट चाटून न जगण्याची, स्वाभिमान न विकण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. ती जपा व पिढी बरबाद न होण्यासाठी आध्यात्मिक शिक्षण द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.एखाद्यात संपत्ती आणि दया नांदल्यास त्याला देवत्व प्राप्त होते, हा मुद्दाही महाराजांनी छान पटवून दिला.
इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाआधी कुटे महाराजांच्या भारुडांनी रंगत वाढवली. राजेंद्र दर्डा यांनी महाराजांचा सत्कार केला, तर अभीष्टचिंतनानिमित्त महाराजांनी राजेंद्र दर्डा यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. संयोजक बबनराव डिडोरे व विशाल डिडोरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. राज्याचे गृहनिर्माण व ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह मान्यवरांची यावेळी आवर्जून उपस्थिती होती.