फायर सेफ्टी यंत्रणा आहे, पण वापरायची कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:03 AM2021-04-27T04:03:26+5:302021-04-27T04:03:26+5:30
औरंगाबाद : विरार येथील आगीच्या घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सोमवारपासून शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट सुरू केले. पहिल्याच दिवशी केलेल्या ...
औरंगाबाद : विरार येथील आगीच्या घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सोमवारपासून शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट सुरू केले. पहिल्याच दिवशी केलेल्या चार रुग्णालयांच्या तपासणीत फायर सेफ्टी यंत्रणा बसवली; मात्र ती कशी हाताळावी याचे प्रशिक्षणच तेथील कर्मचाऱ्यांना नसल्याचा धक्कादायक प्रकार पथकाच्या निदर्शनास आला.
अग्निशमन विभागाचे प्रमुख आर. के. सुरे यांनी सांगितले की, रुग्णालयांच्या मागणीवरून तेथील कर्मचाऱ्यांना फायर सेफ्टी यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मागील आठवड्यात नाशिक व विरार येथील सरकारी रुग्णालयांतील ऑक्सिजन गळती व आगीत अनेकांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमले आहे. हे पथक रुग्णालयांतील ऑक्सिजन गळती व आगीचे प्रकार रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे का, याची तपासणी करणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील ५६ रुग्णालयांची तपासणी केली जाणार आहे. सोमवारपासून या तपासणीस सुरुवात करण्यात आली. शहरातील चार रुग्णालयांची पथकाने तपासणी केली. त्यात संबंधित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फायर सेफ्टीची यंत्रणा कशी हाताळावी, याचे प्रशिक्षण नसल्याचे समोर आले. त्यावर संबंधित रुग्णालयांना प्रशिक्षणासाठी अग्निशमन विभागाला पत्र पाठवण्याची सूचना पथकाने केली. पत्र प्राप्त होताच संबंधित रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती सुरे यांनी दिली.
चार रुग्णालयांची तपासणी
सोमवारी पहिल्या दिवशी या पथकाने केवळ चार रुग्णालयांची तपासणी केली. त्यात डॉ. दहिफळे कोविड सेंटर, डॉ. उकडगावकर कोविड सेंटर, गजानन हॉस्पिटल, जे. जे. हॉस्पिटल अदालत रोड यांचा समावेश आहे. संबंधित रुग्णालयांत आगीचा प्रकार घडल्यास प्राथमिक उपाययोजना करता येतील, अशी व्यवस्था असल्याचे सुरे यांनी स्पष्ट केले.