मुंबई-पुण्याच्या बाहेरही मोठ्या प्रमाणावर ‘टॅलेंट’ आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे-नागराज मंजुळे
By संतोष हिरेमठ | Published: March 26, 2023 07:12 PM2023-03-26T19:12:26+5:302023-03-26T19:12:32+5:30
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने आयोजित नाट्य महोत्सवाचे उद्घाटन रविवारी नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले.
छत्रपती संभाजीनगर : मी चित्रपटात नवीन कलावंत, नवीन विषयदेखील घेतो. चित्रपटात नवीन चेहरे आले पाहिजे. संधी मिळाली तर खूप लोक काहीही करू शकतात. परंतु, आपल्या सीमा ठरलेल्या आहेत. मुंबई-पुण्याच्या बाहेरही मोठ्या प्रमाणावर ‘टॅलेंट’ आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे. अशाच प्रकारचे परिघाबाहेरचे कलावंत डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातून घडले आहेत, असे प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने आयोजित नाट्य महोत्सवाचे उद्घाटन रविवारी नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले. कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे, आकाश ठोसर, अभिनेत्री सायली पाटील, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, विभागप्रमुख प्रा. स्मिता साबळे यांच्यासह प्रवीण डाळींबकर, चरण जाधव आदी उपस्थित होते.
नागराज मंजुळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘करमाळ्यासारख्या भागातून आपल्यातील कलावंताची जडणघडण झाली. गावखेड्यातील वास्तव चित्रपटातून मांडण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. रसिकांना आवडणारे चित्रपट बनवले तर ते नक्की पाहतात.’