उमेदवारीवरून इतर पक्षांत धुसफूस, शिंदेसेनेतील आमदार तिकीट पक्के समजून उतरले प्रचारात

By संतोष हिरेमठ | Published: October 21, 2024 06:46 PM2024-10-21T18:46:21+5:302024-10-21T18:46:50+5:30

उमेदवारी जाहीर होणे बाकी असताना शिंदेसेनेतील आमदारांनी प्रचाराचा नारळ फोडला

There is confusion among other parties over the candidature, preparations are underway for MLAs from Shindesena | उमेदवारीवरून इतर पक्षांत धुसफूस, शिंदेसेनेतील आमदार तिकीट पक्के समजून उतरले प्रचारात

उमेदवारीवरून इतर पक्षांत धुसफूस, शिंदेसेनेतील आमदार तिकीट पक्के समजून उतरले प्रचारात

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यावरून इतर पक्षांमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. अनेक जण उमेदवारी मिळत नसल्याने बंडाच्या तयारीतही आहेत. त्याच वेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदेसेनेच्या विद्यमान आमदारांकडून थेट तयारी सुरू आहे. उमेदवारी जाहीर होणे बाकी असताना तिकीट पक्के समजून निवडणुकीची तयारीही सुरू करण्यात आली आहे. काहींचे प्रचार कार्यालयही सज्ज झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ पैकी ३ जागा भाजपकडे आहेत तर ५ जागा शिंदेसेनेकडे आहेत तर एक जागा उद्धवसेनेकडे आहे. शिंदेसेनेच्या विद्यमान पाच जागांपैकी पैठण विधानसभेतील शिंदेसेनेचे आमदार संदीपान भुमरे हे खासदार झाले. त्यामुळे पैठण येथे आता विधानसभेसाठी भुमरे यांचे चिरंजीव विलास ऊर्फ बापू भुमरे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे तर दुसरीकडे शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट ‘पश्चिम’मधून, आ. प्रदीप जैस्वाल हे ‘मध्य’, पालकमंत्री अब्दुल सत्तार हे सिल्लोडमधून आणि आ. रमेश बोरनारे हे वैजापूरमधून लढणार असल्याचे निश्चित आहे. केवळ पक्षाकडून उमेदवारी घोषित होणे बाकी आहे. त्यामुळे शिंदेसेनेत कोणतीही धुसफूस, बंडखोडी नसल्याची स्थिती आहे. भाजपने मतदारसंघ वाटाघाटीत कन्नड मतदारसंघावर दावा केला आहे. तर शिंदेसेनेकडूनही या जागेवर दावा करण्यात येत आहे. त्यामुळे कन्नडमधून शिंदेसेनेला उमेदवारी मिळते की भाजपला, याकडे महायुतीतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

नारळही फोडला...
शिंदेसेनेच्या एका आमदारांच्या प्रचार कार्यालयाचे नुकतेच स्तंभपूजन करून नारळ फोडण्यात आले, तर अन्य आमदारांचेही प्रचार कार्यालय सज्ज झाले आहे. या प्रचार कार्यालयात बैठकाही सुरू झाल्या आहेत. विद्यमान आमदारांंऐवजी शिंदेसेना नव्या उमेदवारांना संधी देते का, याकडे पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते; परंतु सध्याची स्थिती पाहता विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारीची ‘लाॅटरी’ लागणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

Web Title: There is confusion among other parties over the candidature, preparations are underway for MLAs from Shindesena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.