फुलंब्री, गंगापूर, सोयगाव व खुलताबाद तालुक्यात परवानाधारक सावकार नाही, पिळवणूक थांबेना
By स. सो. खंडाळकर | Published: October 5, 2024 01:06 PM2024-10-05T13:06:20+5:302024-10-05T13:06:48+5:30
फुलंब्री, गंगापूर, सोयगाव व खुलताबाद तालुक्यात एकही परवानाधारक सावकार नाही; जिल्ह्यात परवानाधारक सावकर अवघे ११८
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या अवघी ११८ आहे. अवैध सावकारीचा व्याजदर मनमानी पद्धतीचा असतो. सावकारांवर कारवाया करण्याचे प्रमाण फारच अल्प आहे.
सावकारांविरुद्ध तक्रार गेली की तिकडेच परस्पर मिटवून घेण्याचे प्रयत्न होतात. जिल्ह्यात नऊ पैकी फुलंब्री, गंगापूर, सोयगाव व खुलताबाद या तालुक्यांमध्ये आजघडीला एकही परवानाधारक सावकार नाही. तरी या तालुक्यांमधून सावकारांविरुद्ध शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करून जमिनी बळकावल्याच्या तक्रारी अधिक आहेत. मग जिल्हा उपनिबंधकांडून कठोर कारवाई का होत नाही, हा खरा प्रश्न आहे.
व्याज किती, कायदा काय सांगतो?
शेतकऱ्यांसाठी तारणीवर ९ टक्के व बिगर तारणीवर १२ टक्के व्याजदर आहे. तर बिगर शेतकरी तारणीवर १५ टक्के व बिगर तारणीवर १८ टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर वार्षिक आहे.
११८ परवानाधारक सावकार
नऊ तालुक्यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाचच तालुक्यांत एकूण ११८ परवानाधारक सावकार आहेत. चार तालुक्यांत अवैध सवकारांचा सुळसुळाट चालूच आहे.
तीन हजार कर्जदारांची उचलले २५ कोटी
कोणत्या तालुक्यात किती सावकार?
तालुका परवानाधारक सावकार
छत्रपती संभाजीनगर- १००
वैजापूर- ३
सिल्लोड- ३
पैठण- ६
कन्नड-६
फुलंब्री, सोयगाव, खुलताबाद या तालुक्यांमध्ये सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून एकही परवानाधारक सावकार नाही. गंगापूर तालुक्यात एक परवानाधारक सावकार होता. पण त्याचाही परवाना आता रद्द केला गेला.
आतापर्यंत किती तक्रारी आल्या?
२०१४ साली कायदा अंमलात आल्यापासून जिल्ह्यात सावकारांविरुद्धच्या ५७० तक्रारी आल्या.
तालुकावार तक्रारी अशा :
छत्रपती संभाजीनगर- २४२, वैजापूर- ३९, सिल्लोड- ७२, पैठण- ४५, कन्नड- ६१, सोयगाव- २१, फुलंब्री- १२, खुलताबाद- ७, गंगापूर- ७१
कारवाई काय झाली?
तक्रारींची सुनावणी घेऊन आतापर्यंत शेतकऱ्यांना १०७ एकर २७ आर. शेती परत करण्यात आली. येत्या १५-२० दिवसांत आणखी काही शेती परत करण्यात येणार आहे.
सावकारांबाबत तक्रार कोठे कराल?
जिल्हा उपनिबंधक कार्यालय, ते तालुका उपनिबंधक कार्यालय याठिकाणी तक्रारी करता येतात.
तक्रारीसाठी पुढे या
सावकारांनी नियमात बसून सावकारी करावी. शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये व शेतकऱ्यांनीही पिळवणुकीबद्दल तक्रारी करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
- जिल्हा उपनिबंधक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.