सध्या बंड केल्याचा फायदा दिसत नाही, ‘जिधर हवा चली, उधर चलो’ असा माहोल: जावेद अख्तर
By नजीर शेख | Published: January 5, 2024 11:55 AM2024-01-05T11:55:04+5:302024-01-05T11:57:42+5:30
आता वर्किंग क्लासचे हिरो राहिले नाहीत तर श्रीमंत घरातील काही कामधंदा न करणारे हिरो चित्रपटात दिसू लागले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : ‘ओपन मार्केट’च्या या काळात जीवन हे एक पॅकेज बनले आहे. चांगले, वाईट त्यामध्ये सर्व आहे. मात्र मी कोणते स्वीकारायचे आणि कसे जगायचे हे आपल्या हातात आहे. ‘किस हद तक मैं अपने लिए जी रहा हूँ’ याचा विचार करण्याची गरज आहे, असे वास्तव जेष्ठ गीतकार- लेखक जावेद अख्तर यांनी गुरुवारी येथे आयोजित ९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित मुलाखतीत मांडले.चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी अख्तर यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी कधी मिश्किल टोलेबाजी करत तर कधी गंभीर विषयावर परखड भाष्य करत अख्तर यांनी अनेक बाबी उलगडून दाखविल्या.
अख्तर म्हणाले, पूर्वी देशात समाजवादी विचार होता, त्याचे प्रतिबिंब समाजात उमटत होते. आता ओपन मार्केट आणि ‘लिबरलायझेशन’चा काळ आहे. जगताना सापशिडीचा खेळ चालू आहे. या खेळामध्ये आपण आपल्यासाठी, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या समाजासाठी कोणत्या पातळीपर्यंत जगत आहोत, याचा विचार केला पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्याच्या चित्रपटातील हिरो सामाजिक इश्यूपासून दूर झाले आहेत, अशी खंत व्यक्त करत ते म्हणाले की, आता वर्किंग क्लासचे हिरो राहिले नाहीत तर श्रीमंत घरातील काही कामधंदा न करणारे हिरो चित्रपटात दिसू लागले आहेत. पूर्वी हिरोचा लढा प्रस्थापितांच्या विरुद्ध असायचा. समाजात जे लोक नाखूश होते, तेही प्रस्थापितांच्या विरुद्ध होते. मात्र आता नाखूश राहण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही. बंड केल्याचा काही फायदा होताना दिसत नाही. परंतु, सध्या ‘जिधर हवा चली, उधर चलो’ असा माहोल बनल्याचे सांगत सध्याच्या सामाजिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. संध्यायच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. ऑक्सफर्ड डिक्शनरी दरवर्षी नवीन शब्दांची भर घालते. मात्र, दिल्लीत ( संसदेत) शब्द वगळले जात आहेत. आमीर, वकील, शाह ही पर्शियन नावे आहेत. ही नावे काढून टाकण्याची हिंमत आहे का? काढून तर दाखवा असे सांगत त्यांनी 'शाह' या शब्दावर जोर दिला.
तब आवाज कम होती है
मुलाखतीच्या वेळी काही ध्वनियंत्रणेमध्ये अडथळा येत होता. प्रेक्षकांकडून आवाज कमी येत असल्याची तक्रार झाली. यावर आपल्या मिस्किल स्वभावात जावेद अख्तर यांनी ‘मैं जब सच बोलता हूँ तो माईक की आवाज कम हो जाती है’ अशी टिप्पणी केली. त्यांच्या टिप्पणीला रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवत दाद दिली.