औरंगाबादेत जमावबंदी नाही; राज ठाकरेंच्या सभेबद्दलही पोलीस आयुक्तांची महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 01:30 PM2022-04-26T13:30:58+5:302022-04-26T14:27:50+5:30
औरंगाबाद पोलिसांनी केवळ मुंबई पोलीस अॅक्ट अन्वये आदेश जारी केला आहे, पोलीस आयुक्तांची माहिती.
औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. औरंगाबादेत आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आलं होतं. हे वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी याबाबत माहिती दिली.
“औरंगाबाद पोलिसांनी केवळ मुंबई पोलीस अॅक्ट अन्वये आदेश जारी केला आहे. असे आदेश वर्षभर काढले जात असतात. ही चुकीची माहिती आहे. कलम १४४ अंतर्गत कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या आणि शस्त्र बाळगणं यावर आम्ही लक्ष ठेवत असतो. ही सामान्य प्रक्रिया आहे,” असं निखिल गुप्ता म्हणाले.
कोणत्याही सभेमुळे किंवा कारणामुळे हे आदेश काढले जात नसून हा एक नियमित आदेश असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या सभेविषयीदेखील भाष्य केलं. “राज ठाकरे यांच्या मराठा सांस्कृतिक मंडळात होणाऱ्या सभेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर पोलिसांकडून अधिकृतरित्या याबाबत माहिती देण्यात येईल,” असंही गुप्ता यांनी स्पष्ट केलं.