निर्धन अन् दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत बेड मिळेल, याची ‘नो गॅरंटी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:34 IST2025-04-09T16:13:38+5:302025-04-09T16:34:49+5:30
धर्मादाय रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात फलक लावून त्यात धर्मादाय पद्धतीचे किती रुग्ण दाखल आहेत, किती जागा रिकाम्या आहेत, याची माहिती देणे बंधनकारक आहे. परंतु बहुतांश रुग्णालयांत असे फलक दिसत नाहीत.

निर्धन अन् दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत बेड मिळेल, याची ‘नो गॅरंटी’
छत्रपती संभाजीनगर : निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना राखीव बेड मिळेल, याची काही गॅरंटी नाही, तुम्ही अन्य रुग्णांप्रमाणे नोंदणी प्रक्रिया करून रुग्णाला दाखल करा, असा अजब सल्ला देऊन रुग्णांचा खिसा रिकामा करण्याचा उद्योग काही धर्मादाय रुग्णालयांमध्ये सुरू आहे. निर्धन, दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत आणि सवलतीत उपचार मिळणे कठीणच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले.
पुण्यातील एका धर्मादाय रुग्णालयात एका गर्भवती तरुणीला जीव गमवावा लागल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर शहरातील काही धर्मादाय रुग्णालयांत निर्धन, दुर्बल घटकांतील रुग्णाला दाखल करण्यासंदर्भात पडताळणी करण्यात आली. काही धर्मादाय रुग्णालयांतही संख्या दाखविण्यापुरतेच उपचार होतात.
फलक गायब, नावातून धर्मादाय गायब
धर्मादाय रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात फलक लावून त्यात धर्मादाय पद्धतीचे किती रुग्ण दाखल आहेत, किती जागा रिकाम्या आहेत, याची माहिती देणे बंधनकारक आहे. परंतु बहुतांश रुग्णालयांत असे फलक दिसत नाहीत. एकूण खाटांची संख्या संकेतस्थळावर दिसत असली, तरीही त्यातील किती शिल्लक आहेत, याची माहिती प्रत्यक्षात धर्मादाय रुग्णालयात दिली जात नाही. त्यातूनच रुग्णांची व त्यांच्या कुटुंबीयांची फरपट होते. काही रुग्णालयांच्या नावात ‘धर्मादाय’चा उल्लेखही नाही.
काय आढळले पाहणीत?
रुग्णालय क्रमांक-१
निर्धन घटकातील रुग्णाला दाखल करायचे असल्याचे सांगितल्यावर ‘रुग्णाला बेड मिळेल की नाही, हे सांगता येणार नाही’ असे उत्तर एका कर्मचाऱ्याने दिले. त्याने एका अधिकाऱ्याकडे पाठविले. परंतु अधिकाऱ्याने ‘माझ्याकडे का पाठविले’ म्हणून कर्मचाऱ्याचीच कानउघाडणी केली. या रुग्णालयात रिक्त खाटा किती, किती रुग्ण दाखल, हे दर्शविणारा फलक नाही.
रुग्णालय क्रमांक-२
दुर्बल घटकातील रुग्णाला उपचारासाठी दाखल करायचे असल्याचे सांगितले. तेव्हा ‘आधी तुम्ही ॲडमिशनची प्रक्रिया करून घ्या, दुर्बल घटकात उपचार होईल की नाही, हे नंतरच सांगता येईल’ असे उत्तर देण्यात आले. या ठिकाणीही रिक्त खाटांसंदर्भातील फलक नव्हता.
रुग्णालय क्रमांक-३
हे धर्मादाय रुग्णालय आहे, याची कल्पनाच कर्मचाऱ्यांना नव्हती. निर्धन घटकातील रुग्णाला दाखल करायचे सांगितल्यावर केवळ जनआरोग्य योजनेत उपचार होतात, असे अजब उत्तर कर्मचाऱ्याने दिले. या रुग्णालयातही रिक्त खाटा, दाखल रुग्णांची संख्या दर्शविणारा फलक नव्हता.
धर्मादाय रुग्णालयातील योजना
निर्धन रुग्ण : पूर्णपणे मोफत उपचार
- उत्पन्न मर्यादा (वार्षिक १.८० लाख रुपये)
- १० टक्के राखीव बेड
दुर्बल घटकातील रुग्ण : सवलतीच्या दरात उपचार
-उत्पन्न मर्यादा (वार्षिक ३.६० लाख रुपये)
-१० टक्के राखीव बेड
आवश्यक कागदपत्रे
-शिधापत्रिका किंवा
-दारिद्र्यरेषेखालील पत्रिका किंवा
-वार्षिक उत्पन्नाचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र.
एकूण धर्मादाय रुग्णालये-२०
रुग्णालयांच्या तपासणीची गरज
धर्मादाय रुग्णालयांत गोरगरिबांना धर्मादाय योजनेत उपचार मिळत नाहीत. केवळ नावापुरत्याच योजना आहेत. त्यामुळे धर्मादाय रुग्णालयांची शासनाने गंभीरपणे तपासणी करण्याची गरज आहे.
- कुंदन लाटे, मराठवाडा प्रदेश मुख्य समन्वयक, रुग्ण हक्क परिषद