'शेतीची वाटणी नाही, लग्नही लावून देत नाहीत'; संतप्त दोन मुलांनी वडिलांचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 07:53 PM2024-05-24T19:53:05+5:302024-05-24T19:54:23+5:30

दोन्ही सख्ख्या मुलांच्या मारहाणीत जखमी पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू

'There is no share of the farm, they do not even marry'; Two angry sons killed their father | 'शेतीची वाटणी नाही, लग्नही लावून देत नाहीत'; संतप्त दोन मुलांनी वडिलांचा केला खून

'शेतीची वाटणी नाही, लग्नही लावून देत नाहीत'; संतप्त दोन मुलांनी वडिलांचा केला खून

वाळूज महानगर : वडील लग्न करून देत नाहीत व शेतीची वाटणी करीत नसल्याचा राग धरून दोघा भावंडांनी जन्मदात्या पित्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी पिता संपत लक्ष्मण वाहूळ (४८) यांचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी एक हल्लेखोर मुलगा कारागृहात असून दुसरा फरार आहे.

वडगाव कोल्हाटी येथे संपत लक्ष्मण वाहूळ (४८) हे पत्नी शांताबाई, मुले पोपट व प्रकाश यांच्यासह वास्तव्यास आहेत. ८ मे रोजी संपत यांचा लहान मुलगा प्रकाश व मोठा मुलगा पोपट यांनी वडिलांना ‘तुम्ही आमचे लग्न करून देत नाही व शेतीही वाटून देत नसल्याचे’ सांगत वाद घातला. संपत यांनी मुलांना ‘तुम्ही चांगले वागत नसल्याने तुम्हाला कोण मुली देणार?’ असे म्हणताच पोपटने चाकू व प्रकाशने धारदार हत्याराने वडिलांवर अनेक वार केले. संपत यांना नातेवाइकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

संपत पंधरा दिवसांपासून शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र, गुरुवारी रात्री संपत यांची प्राणज्योत मालवली. भावंडांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करीत आहेत. प्रकाश हर्सूल कारागृहात असून, पोपट पंधरा दिवसांपासून फरार आहे. पोपट गुंड प्रवृत्तीचा असून, त्याला पोलिसांनी यापूर्वीच तडीपार केले होते. पोपटचा शोध एमआयडीसी वाळूज पोलिसांची दोन पथके घेत आहेत.

Web Title: 'There is no share of the farm, they do not even marry'; Two angry sons killed their father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.