वाळूज एमआयडीसी लगतच्या खाजगी जागेवरील १६०० उद्योगांतून हजारो कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:17 IST2024-12-19T15:16:49+5:302024-12-19T15:17:48+5:30

नव्याने किंवा आहे त्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रा.पं. हद्दीतील खासगी भूखंड खरेदी करून त्यावर उद्योग थाटण्यास २०१० च्या सुमारास सुरुवात झाली.

There is no space in Waluj MIDC; 1600 industries on private land have a turnover of thousands of crores | वाळूज एमआयडीसी लगतच्या खाजगी जागेवरील १६०० उद्योगांतून हजारो कोटींची उलाढाल

वाळूज एमआयडीसी लगतच्या खाजगी जागेवरील १६०० उद्योगांतून हजारो कोटींची उलाढाल

- संतोष उगले

वाळूज महानगर : औद्योगिक परिसरात नव्याने उद्योग थाटण्यासाठी किंवा सुरू असणाऱ्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी वाळूज एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध नसल्याने उद्योजकांनी लगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील खासगी भूखंड खरेदी करून त्यावर उद्योग थाटले आहेत.

आजघडीला औद्योगिक परिसराच्या बरोबरीनेच खासगी गट नंबरमध्ये उद्योगातून उत्पन्न मिळवले जात आहे. एमआयडीसी प्रशासनाने १२९८ हेक्टर जमीन संपादित करून त्यावर औद्योगिक वसाहत उभारली. बजाज ऑटो वाळूजमध्ये येताच औद्योगिक विकासाला गती मिळाली. त्यातून बजाज कंपनीसाठी लागणारा कच्चा माल, वाहनांचे सुटे भाग पुरविण्यासाठी ‘पुरवठादारांची साखळी’ तयार झाली. कालांतराने मागणी वाढल्याने याच पुरवठादारांनी इतर छोट्या उद्योजकांना ऑर्डर दिल्याने दुसरी साखळी तयार झाली. त्यातून अल्पावधीतच वाळूज औद्योगिक परिसरातील भूखंडावर उद्योजकांनी उद्योग थाटून स्वत:चे उद्योग सुरू केले आणि वाढवले.

उद्योगाचा विस्तार, नवीन उद्योगांची सुरुवात
नव्याने किंवा आहे त्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रा.पं. हद्दीतील खासगी भूखंड खरेदी करून त्यावर उद्योग थाटण्यास २०१० च्या सुमारास सुरुवात झाली. वाळूजलगत असणाऱ्या जोगेश्वरी, रांजणगाव, घाणेगाव, वडगाव, करोडी, साजापूर, विटावा, तिसगाव, पंढरपूर, तुर्काबाद आदी गट नंबरमध्ये तब्बल १६०० पेक्षा अधिक उद्योगांतून सुमारे ५० हजार कामगारांना थेट, तर १० हजार कामगारांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो.

बहुतांश उद्योग ‘प्रेस पार्ट’चे
प्रोसेस युनिट वगळता या ठिकाणी वाळूज एमआयडीसीच्या भूखंडावर असणारे बहुतांश उद्योग सुरू असल्याचे आढळते. त्यातही प्रेस पार्ट, इंजिन पार्ट, रबर, प्लॅस्टिक मोल्डिंगचे उत्पादन घेणारे सर्वाधिक कारखाने, युनिट गट नंबरमध्ये आढळून येतात. सदरील कामासाठी लागणारी विस्तीर्ण जागा, शिवाय गावालगत असल्याने कामगार सहज उपलब्ध होतात.

कामगार ते उद्योजक
सुरुवातीच्या काळात कंत्राटी कामगार म्हणून बड्या कंपन्यांमध्ये कामावर रुजू झालेले कामगार पुढे अनुभवाच्या जोरावर स्वत:चा उद्योग थाटून उद्योजक झाल्याचे याच गट नंबरमध्ये बघायला मिळतात. अनेकदा कठीण जॉबचे काम जे शहरासह नगर, नाशिक आणि पुणे येथील उद्योजकांना शक्य होत नाही, ते कठीण काम कामगार ते उद्योजक बनलेल्या गट नंबरमधील उद्योजकांकडून सहज शक्य होते, अशी ख्याती आहे.

गट नंबरमधील गावाचे नाव सुरू असणारे उद्योग
वडगाव कोल्हाटी - ९२
करोडी - २७२
साजापूर - ३१०
घाणेगाव - ८२
विटावा - ३४
वाळूज - ३२
जोगेश्वरी - ३४७
रांजणगाव - ४१२, यासह पंढरपूर, तुर्काबाद आणि तीसगाव ग्रा.पं. हद्दीत असलेल्या गट नंबरमध्येसुद्धा उद्योग थाटण्यात आलेले आहेत.

Web Title: There is no space in Waluj MIDC; 1600 industries on private land have a turnover of thousands of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.