बंगळुरूसाठी छत्रपती संभाजीनगरातून रेल्वे नाही, पण आता हवाई सेवा सुरु होणार
By संतोष हिरेमठ | Published: March 27, 2023 08:02 PM2023-03-27T20:02:40+5:302023-03-27T20:02:59+5:30
कोरोना प्रादुर्भावापूर्वी म्हणजे ३ वर्षांपूर्वी बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होती.
छत्रपती संभाजीनगर : शहरातून आता अवघ्या दीड तासांत बंगळुरूला पोहोचता येणार आहे. इंडिगोकडून २८ मार्चपासून आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. तब्बल ३ वर्षांनंतर शहरातून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होत आहे.
कोरोना प्रादुर्भावापूर्वी म्हणजे ३ वर्षांपूर्वी बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील विमानसेवा काही दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्यात विमानसेवा सुरळीत झाली. शहरातील दिल्ली, मुंबई, हैदराबाद विमानसेवा सुरू झाली. मात्र, बंगळुरू विमानसेवेची प्रतीक्षाच करावी लागली. अखेर ही सेवा आता मंगळवारपासून पुन्हा एकदा सुरू होत आहे. त्यामुळे आयटी हब म्हणून ओळख असलेल्या बंगळुरूशी शहर हवाई कनेक्टिव्हिटीने जोडले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातून बंगळुरूसाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रेल्वे नाही. मात्र, या शहरासाठी आता हवाईसेवा उपलब्ध राहणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही विमानसेवा राहील.