‘काही तरी गडबड आहेच, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नैराश्य’: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 01:30 PM2022-11-02T13:30:28+5:302022-11-02T13:30:58+5:30
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे
औरंगाबाद : काही तरी गडबड आहेच. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नैराश्य दिसत आहे. या सरकारचे राज्याकडे अजिबात लक्ष नाही. महाराष्ट्रात येऊ घातलेले अनेक प्रकल्प गुजरात या एकाच राज्याकडे जात आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांनी दहीहंड्याच फोडायच्या, हनुमान चालिसाच वाचायची, असेच म्हणावे लागेल, असे परखड मत मंगळवारी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले.
त्यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. पिके, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही पंचनामे झाले नाहीत. पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी पैसे मागत आहेत. संबंधित मंत्र्यांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. शेवटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे महत्त्वाचे आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाहीत, याकडे लक्ष वेधले असता थोरात म्हणाले, याचे कारण त्यांनाच विचारले पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत. जनतेच्या भावना राज्यपालांना भेटून आम्ही कळवल्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ७ नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात देगलूर येथे येईल. नांदेड व शेगाव येथे जाहीर सभा होतील. ही यात्रा १४ दिवस महाराष्ट्रात राहील व २० नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात जाईल. जे जे पुरोगामी विचारसरणीचे आहेत, त्या सर्व पक्ष संघटनांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आमचे आवाहन आहे. ही यात्रा बेरोजगारी, महागाई या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधून भेदभावाच्या राजकारणाला मूठमाती देण्याचा संदेश देत आहे.
पत्रपरिषदेस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आ. हम. एम. शेख, नामदेव पवार, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, डॉ. पवन डोंगरे, हमद चाऊस, वरुण पाथ्रीकर, डॉ. अरुण शिरसाट, डॉ. नीलेश अंबेवाडीकर, मंजू लोखंडे, अनिता भंडारी आदींची उपस्थिती होती.