'हॉस्टेलमध्ये त्रास होतोय',विद्यार्थिनीने भावाला सांगितले होते; आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 01:06 PM2022-08-27T13:06:30+5:302022-08-27T13:07:35+5:30
हॉस्टेममध्ये आत्महत्येपूर्वी दिली होती भावाला त्रासाची माहिती, याबाबत लेखी तक्रारही केली होती
औरंगाबाद : वाणिज्य शाखेतील आरती सर्जेरावं कोल्हे या विद्यार्थिनीने शुक्रवारी सायंकाळी देवगिरी महाविद्यालयातील वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख नव्हता तर केवळ जीवनावर भाष्य केल्याचे आढळून आले होते. दरम्यान, बहिणीला वसतिगृहात त्रास होता याबाबत लेखी तक्रारही देण्यात आली होती, अशी माहिती आरतीच्या भावाने दिली आहे. यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
देवगिरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात तिसऱ्या मजल्यावर रूम नंबर ४४ मध्ये बी.कॉम प्रथम वर्षातील आरतीने (२०, रा. गुरुपींप्री, ता. घनसावंगी, जि. जालना) आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. मात्र, या प्रकरणात आता नवीन वळण मिळालं आहे. आत्महत्या करण्याच्या काहीदिवस अगोदर आरतीने भाऊ गणेशला वसतिगृहात त्रास होत असल्याची माहिती दिली होती. या संदर्भात वसतिगृहात लेखी तक्रार देखील केली होती, अशी माहिती गणेश कोल्हेने दिली आहे. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात केल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी आरतीच्या वडिलांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन सुरु आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.
आरतीचे वडील शेतकरी असून मोठ्या बहिनीचे लग्न झालेले आहे. १ ऑगस्टपासून ती वसतिगृहात शिकण्यासाठी आली होती. लहान बहीण व भाऊ शिक्षण घेत आहेत. आरती शांत स्वभावाची होती. फारशी बोलत नव्हती. तिला नैराश्य का आले? या घटनेच्या मागील कारणांचा शोध वेदांतनगर पोलीस घेत आहेत. तिच्या मृत्यूमुळे विद्यार्थिनींतून हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीने वसतीगृह चांगले आहे. मैत्रिणींबद्दल काही तक्रार नाही. याशिवाय वैय्यक्तिक बरेच काही लिहिले आहे. ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.
'काळ्याकुट्ट जगात जगायचे नाही' , सुसाईड नोट सापडली
‘जीवन हे सुंदर आहे.’ असे म्हणून तिने लिहायला सुरू केलेल्या पत्रात ‘जीवनात हार्ड वर्क केले पाहिजे. मीपण हार्ड वर्क करणार आहे. मी एक महिन्यापूर्वी इथे आले. माझे वसतिगृह, काॅलेज छान आहे. मैत्रिणीही खूप चांगल्या आहेत. मला जीवनाचा कंटाळा आलाय. मला या काळ्याकुट्ट जगात जगायचे नाही. हे ओझे कसे सांभाळायचे, मी गेल्यानंतर एकही मैत्रिणीने हॉस्टेल सोडू नका.’ असा आशय असून शेवटचा शब्द ‘अलविदा’ लिहिला आहे. या अडीच पानांच्या चिठ्ठीतून तिला नेमके काय म्हणायचे, तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय याबद्दल संभ्रम आहे.