खगोलशास्त्राबद्दल जेवढी अंधश्रद्धा आहे तेवढी कोणत्याही शास्त्रात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:18 PM2018-05-30T16:18:04+5:302018-05-30T16:19:39+5:30
खगोलशास्त्राबद्दल जेवढी अंधश्रद्धा आहे तेवढी कोणत्याही शास्त्रात नाही, असे स्पष्ट विचार खगोलशास्त्राचे अभ्यासक व पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी येथे मांडले.
औरंगाबाद : धूमकेतूमधून पृथ्वी गेल्यास सर्व माणसे मरतात, उल्का दिसली तर मनातील मनोकामना पूर्ण होतात किंवा चंद्राभोवती खळे निर्माण झाले तर अप्रिय घटना घडते, या अंधश्रद्धा आहेत. तसेच ग्रहांचा व अंगठीतील खड्यांचा काहीच संबंध नाही. मात्र, खगोलशास्त्राबद्दल जेवढी अंधश्रद्धा आहे तेवढी कोणत्याही शास्त्रात नाही, असे स्पष्ट विचार खगोलशास्त्राचे अभ्यासक व पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी येथे मांडले.
एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब औैरंगाबादच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सोमण यांच्या उदाहरणांसह देण्यात येणाऱ्या शैलीमुळे व्याख्यान रंगले. विविध उदाहरणे देत दा.कृ. सोमण यांनी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. खगोलशास्त्राकडे विज्ञानाचे शास्त्र म्हणून पाहिले पाहिजे, यावर त्यांनी आपल्या व्याख्यानात भर दिला.
त्यांनी सांगितले की, दर ३३ वर्षांनी सिंह राशीतून १७ नोव्हेंबर रोजी मोठा उल्का वर्षाव होत असतो. पृथ्वी त्या दिवशी ‘टेंपल टटल’ धूमकेतूच्या मार्गातून भ्रमण करते. १७ नोव्हेंबर २००० रोजी तासाला ४०० उल्का पृथ्वीवर पडल्या होत्या. आता १७ नोव्हेंबर २०३३ रोजी रात्री असा मोठा उल्का वर्षाव होणार आहे. स्वीफ्ट धूमकेतू १४ आॅगस्ट २१२६ रोजी पृथ्वीवर आदळणार अशी बातमी होती. मात्र, आता शास्त्रज्ञांनी सांगितले की, तो पृथ्वीपासून २ कोटी २० लाख कि.मी. अंतरावरून जाणार आहे. यामुळे घाबरण्याचे कारण नाही. १६ डिसेंबर २०१९ रोजी दक्षिण भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.
मात्र, औरंगाबादेत हे सूर्यग्रहण खंडग्रास दिसणार असल्याचे सांगून सोमण पुढे म्हणाले की, खगोलशास्त्रासारखा आवडीचा छंद कोणताही नाही. पुस्तक वाचावे लागते तर आकाश सदैव उघडे असते. रात्रीच्या वेळी आकाशातील नक्षत्र बघण्यास काहीच खर्च येत नाही. लहान असो वा ज्येष्ठ सर्वांनी आकाश दर्शन करावे, खगोलशास्त्राचे तेवढे ज्ञान समाजात निर्माण होईल. त्यामुळे अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होईल, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी एमजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंैधकर यांची उपस्थिती होती. भाग्यश्री केढे यांनी सूत्रसंचालन केले.
पंचांग हे आकाशाचे वेळापत्रक
दा.कृ. सोमण यांनी सांगितले की, रेल्वेचे जसे वेळापत्रक असते तसेच पंचांग हे आकाशाचे वेळापत्रक आहे. त्यापलीकडे काही नाही. त्यांनी सांगितले की, राशीभविष्य बघण्यापेक्षा आपले भविष्य स्वत:च्या मनगटाच्या जोरावर घडविणे आवश्यक आहे.