"थोडा एंटरटेनमेंट भी होना चाहिए..."; सुप्रिया सुळेंची राज ठाकरेंवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 04:31 PM2022-04-18T16:31:20+5:302022-04-18T16:34:52+5:30
''ते येतील भाषण करून जातील, त्यांना जास्त महत्व देऊ नका''
औरंगाबाद : 'भोंगा' लावण्याच्या अल्टीमेटमनंतर राज ठाकरे ( MNS Raj Thackeray ) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. यावर राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule) यांनी आज खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 'ते येतील भाषण देतील अन जातील, त्यांना जास्त महत्व कशाला देता ? दूरदर्शन पाहून कंटाळा आला, तर आपण स्टारप्लस लावा, थोडा एंटरटेनमेंट भी होना चाहिए ना'' असा खोचक टोला खा. सुळे यांनी लगावला आहे.त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात बोलत होत्या.
राज ठाकरे यांनी 'अजान'वर भाष्य करत संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. यावेळी केलेल्या भाषणात राज यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. तसेच औरंगाबाद येथे १ मे रोजी सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. आज राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे शहरात आल्या आहेत. पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात खा. सुळे यांनी ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.''रोज रोज दूरदर्शन पाहून कंटाळा आला आहे. कधी तरी स्टार लावा. थोडा एंटरटेनमेंट होना चाहिए'' अशी खोचक टीका सुळे यांनी केली. ''ते येतील भाषण करून जातील, त्यांना जास्त महत्व देऊ नका'' असा सल्लाही सुळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
राज ठाकरेंच्या २ मोठ्या घोषणा
दरम्यान, राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ जून रोजी मनसे सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. भोंगे हटविण्याचा विषय मुस्लीम बांधवांनी धर्मावर नेऊ नये. हा सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.