मराठा समाजाचा कोणताही बंद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:58 PM2018-01-08T23:58:06+5:302018-01-08T23:58:06+5:30
: महाराष्ट्र बंद ठेवून राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे काम कोणीही करू नये. शिवाय १२ जानेवारी रोजी होणा-या माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवात व्यत्यय येऊ नये, यासाठी १० जानेवारी रोजी बंद ठेवल्या जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मराठा क्रांती मोर्चातर्फे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र बंद ठेवून राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे काम कोणीही करू नये. शिवाय १२ जानेवारी रोजी होणा-या माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवात व्यत्यय येऊ नये, यासाठी १० जानेवारी रोजी बंद ठेवल्या जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मराठा क्रांती मोर्चातर्फे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले की, मराठा समाजाने १० जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिल्याच्या पोस्ट विविध सोशल मीडियावरून फिरत आहेत. असा कोणताही बंद मराठा क्रांती मोर्चा अथवा अन्य कोणत्याही मराठा समाज संघटनेने पुकारलेला नाही. असे असताना सोशल मीडियावरून व्हायरल होत असलेल्या या पोस्टमुळे समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. कोरेगाव-भीमाच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदमुळे विविध ठिकाणी झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये कोट्यवधी रुपये किमतीच्या सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले. यातून सामान्य जनता सावरलेली नाही, असे असताना काही लोक खोडसाळपणाने मराठा समाजाच्या नावे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून समाजाची दिशाभूल करीत आहेत. १२ जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे माँसाहेब जिजाऊं चा जन्मोत्सव होत आहे. या जन्मोत्सवानिमित्त लाखो बांधव सिंदखेडराजा येथे माँ साहेबांना अभिवादन करण्यासाठी जातात. हा कार्यक्रम उत्साहात साजरा व्हावा, यासाठी सर्व बांधव रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. असे असताना या कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीच बंद पुकारण्याचे षड्यंत्र समाजकंटकांनी रचले असावे, असा आमचा आरोप आहे. सोशल मीडियावर बंदबाबत पोस्ट व्हायरल करणा-यांचा पोलिसांनी शोध घ्यावा आणि त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार आम्ही पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे करणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला रवींद्र काळे, विनोद पाटील, अभिजित देशमुख, सुरेश वाकडे, मनोज गायके, सखाराम काळे पाटील, कुंटे महाराज, डॉ. शिवानंद भानुसे, सुनील कोटकर, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश गायकवाड उपस्थित होते.