विद्यापीठात काम करीत असताना गुणवत्तेशी तडजोड नाही : कुलगुरू येवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:36 PM2019-07-17T18:36:35+5:302019-07-17T18:41:11+5:30
डॉ. येवले यांनी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्य करताना शिस्त आणि पदभरतीला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल. काम करीत असताना गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही, असे प्रतिपादन नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडून मंगळवारी (दि.१६) सकाळी डॉ. येवले यांनी राजदंड घेत स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठ प्रशासनातर्फे महात्मा फुले सभागृहात नवीन कुलगुरूंचे स्वागत आणि अतिरिक्त पदभार असलेले कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. येवले म्हणाले की, प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विद्यापीठाची प्रगती आणि नावलौकिक उंचाविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रश्न जवळपास सारखेच आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मेहनत करण्याची प्रचंड क्षमता असते. त्या विद्यार्थ्यांना योग्य त्याठिकाणी संधी उपलब्घ करून देण्याचे कार्य विद्यापीठाला करावे लागणार आहे. राज्यपाल तथा कुलपतींनी सोपवलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ. राजेश करपे, डॉ. राहुल मस्के, कुलसचिव डॉ. साधना पांडे, ज्योती येवले, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके, परीक्षा मंडळ संचालक डॉ. गणेश मंझा यांच्यासह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. डॉ. येवले यांचा प्रशासनातर्फे कुलसचिव डॉ. साधना पांडे, प्राध्यापकांच्या ‘बामुटा’ संघटनेतर्फे डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. राम चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. कैलास पाथ्रीकर, पर्वत कासुरे यांनी सत्कार केला.
पीएच.डी. विभागाकडे देणार सर्वाधिक लक्ष
विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र असले पाहिजे. विद्यापीठ पीएच.डी.चे संशोधन करीत असताना सामाजिक उपयोगिता, विभाग व राष्ट्राची गरज आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व प्राधान्याने लक्षात घेतले पाहिजे. हा विभाग सक्षम असेल, तर विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पडेल. याशिवाय परीक्षा विभागही गतिमान असला पाहिजे. परीक्षा झाल्यानंतर अल्प वेळात निकाल जाहीर करण्याकडे अधिक लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
खूप शिकायला मिळाले : शिंदे
विद्यापीठाच्या अतिरिक्त कुलगुरुपदाच्या दीड महिन्याच्या कार्यकाळात अनेक गोष्टी शिकता आल्या. या काळात अनेकांचे सहकार्य मिळाले, असे मावळते कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले. ज्या विद्यापीठात शिकलो त्या विद्यापीठाचे सर्वोच्चपद मिळणे हा माझा सन्मान होता, असेही त्यांनी सांगितले.