शववाहिनी नसल्याने औरंगाबादच्या घाटीत मृतदेहाची होतेय अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:10 AM2018-04-20T00:10:56+5:302018-04-20T00:13:18+5:30
घाटी रुग्णालयात मृत्यूनंतर एकप्रकारे मृतदेहाचा छळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या अनेक रुग्णांचे शवविच्छेदन करावे लागते; परंतु शववाहिनीअभावी मेडिसिन विभागापासून शवविच्छेदनगृहापर्यंत मृतदेह स्ट्रेचरवरूनच नेण्याची कसरत दररोज करावी लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात मृत्यूनंतर एकप्रकारे मृतदेहाचा छळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या अनेक रुग्णांचे शवविच्छेदन करावे लागते; परंतु शववाहिनीअभावी मेडिसिन विभागापासून शवविच्छेदनगृहापर्यंत मृतदेह स्ट्रेचरवरूनच नेण्याची कसरत दररोज करावी लागते. अशावेळी नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
रुग्णालयामध्ये उपचार घेताना निधन झालेल्या रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिनीचा वापर होतो. यामध्ये विभागातून शवविच्छेदनगृहापर्यंत तसेच शवविच्छेदनगृहापासून घरापर्यंत सेवा महत्त्वपूर्ण ठरते. घाटीतील अपघात विभागापासून शवविच्छेदनगृहाचे अंतर अधिक नाही; परंतु मेडिसिन विभाग रुग्णालयाच्या दुसऱ्या टोकावर आहे.
या ठिकाणाहून मृतदेह शवविच्छेदनगृहापर्यंत नेण्यासाठी कर्मचारी आणि नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. घाटी रुग्णालयास प्राप्त झालेल्या शववाहिनीचा वापर आजघडीला रुग्णवाहिका म्हणून होत आहे. परिणामी, शववाहिनीअभावी थेट स्ट्रेचरवरून मृतदेह ओढत नेण्याशिवाय पर्याय नाही. अनेकदा तर कर्मचाºयांअभावी नातेवाईकांनाच मृतदेह घेऊन जावा लागतो.
कर्मचारी सोबत येत नसल्याने शवविच्छेदनगृह कुठे आहे, याची विचारणा करण्याचीही वेळ नातेवाईकांवर ओढावते. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने नातेवाईक आधीच दु:खात असतात. अशावेळी नातेवाईकांच्या वेदना कमी करण्याऐवजी जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होतो. घाटीत जागोजागी रुग्णवाहिका उभ्या असतात. त्यामुळे शवविच्छेदनगृहापर्यंत मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांकडून विचारणा केली जाते. रुग्णवाहिकांचा नातेवाईकांना आधार मिळतो; परंतु त्यासाठी रक्कम मोजण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे.
ऊन, पावसाचा मारा
शववाहिनीअभावी ऊन, पावसाचा मारा सहन करीत मृतदेह नेण्याची वेळ येत आहे. हा एकप्रकारे छळ असल्याचीच ओरड नातेवाईकांकडून होत आहे. मेडिसिन विभागापासून शवविच्छेदनगृहापर्यंत शव नेण्यासाठी न्यायवैद्यकशास्त्र विभागाने घाटी प्रशासनाकडे शववाहिनीची मागणी केली आहे.
लवकरच प्रस्ताव देणार
स्ट्रेचरवरूनच मृतदेह नेले जात आहेत; परंतु शववाहिनीसाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव देण्यात येणार आहे. लवकरच शववाहिनी उपलब्ध होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे म्हणाले.