संविधानाला कुठलाही धोका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:52 AM2017-09-26T00:52:32+5:302017-09-26T00:52:32+5:30
कुणाच्या ‘स्वीट चॉइस’वरसुद्धा संविधानात दुरुस्ती होऊ शकत नाही,’ असे स्पष्ट प्रतिपादन आज येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एल. आचलिया यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘या देशाच्या संविधानाला कुठलाही धोका नाही. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर हे संविधान आधारलेले आहे. ही पायाभरणी इतकी भक्कम आहे की, कुणाच्या ‘स्वीट चॉइस’वरसुद्धा संविधानात दुरुस्ती होऊ शकत नाही,’ असे स्पष्ट प्रतिपादन आज येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एल. आचलिया यांनी केले.
ते दुपारी तापडिया नाट्यमंदिरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर्स लॉयर डे सेलिब्रेशन’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील होते. माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत.
अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुंबई- गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. व्ही.डी. साळुंके, ज्येष्ठ विधिज्ञ नानासाहेब शिंदे, अॅड. प्रल्हाद खंडागळे पाटील आदींची यावेळी भाषणे झाली. प्रारंभी, पाहुण्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागताध्यक्ष अॅड. एस.आर. बोदडे यांनी प्रास्ताविक केले. ५ जुलै १९२३ रोजी बाबासाहेबांनी वकिली सुरू केली, तो दिवस गेल्या पाच वर्षांपासून आपण ‘लॉयर डे’ म्हणून साजरा करीत आहोत, असे बोदडे यांनी सांगितले.
मराठा मोर्चे संघ पुरस्कृत
अलीकडेच निघालेले मराठा मोर्चे हे राष्टÑीय स्वयंसेवक संघाने आयोजित केले होते, असा सनसनाटी आरोप करून कोळसे पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे. मराठ्यांच्या जीवनात एवढ्या चांगल्या गोष्टी कधी घडत नाहीत, अशी टिपणीही त्यांनी केली. संभाजी महाराजांना जाळायला महारांनी जागा दिली होती. त्यावरून तुमचं आमचं नातं काय हे लक्षात घ्या, असे ते म्हणाले.
बाबासाहेबांचे मोठे योगदान
न्या. व्ही.एल. आचलिया यांनी सांगितले की, भारताच्या नवनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. सामाजिक गुलामगिरीतून या देशाला मुक्त करण्याचे त्यांनी केलेले कार्यही अविस्मरणीय आहे. मीसुद्धा एका शेतकरी कुटुंबातून इथपर्यंत आलो. यामागे बाबासाहेबांचीच प्रेरणा आहे. आजच्या दिनी आपण बाबासाहेबांच्या मार्गाने जात आहोत की नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
सुदैव आणि दुर्दैव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशात जन्माला आले, हे या देशाचे सुदैव होय, तर बाहेरच्या देशांना ते कळले; पण आपल्या देशाला ते अद्यापही समजले नाहीत, हे दुर्दैव होय, अशी खंत भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केली. या देशाने मानसिक आणि भावनिक पातळीवर स्वीकारलेले नाही. कारण या देशाच्या मनातून जातीचा शूद्र विचार यत्किंचितही गेलेला नाही, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.