गद्दार कोण, याची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाच नाही; पण सत्तारांना झुकते माप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:56 PM2020-01-07T12:56:41+5:302020-01-07T13:00:58+5:30
गटबाजीच्या राजकारणात यापुढे जुन्या नेत्यांना सहन न करण्याचे ‘मातोश्री’ वरून संकेत
औरंगाबाद : राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि त्यांच्यावर गद्दारीचा आरोप करणाऱ्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे या दोघांचेही कुठलेही स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतले नाही मात्र त्याचवेळी नव्यांना उभारी देण्याचा भाग म्हणून अब्दुल सत्तार यांनाच झुकते माप दिल्याची माहिती मिळाली.
शिवसेनेला आता पक्षात नवीन काम करणाऱ्यांना उभारी द्यायची आहे. रामदास कदम, दिवाकर रावते यांच्यासारखी मंडळी मंत्रिमंडळाबाहेर ठेवल्यामुळे पक्षांतर्गत मी आणि मीच असे राजकारण यापुढे चालणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे दिला आहे. परिणामी आता संघटनेत होणाऱ्या गटबाजीच्या वादात यापुढे जुन्या नेत्यांना फार सहन केले जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. अब्दुल सत्तार आणि खैरे यांच्यातील गद्दार कोण आणि सुभेदार कोण या वादात मुख्यमंत्र्यांनी ‘ मातोश्री’वर कुणाचेही ऐकून न घेता एकत्रित काम करण्याचा सल्ला दोघांनाही दिला. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री सत्तार यांच्या बाजूनेच असल्याचे दिसते. ज्या तावातावाने खैरे यांनी सत्तार यांना मातोश्रीवर पाऊल ठेवू देण्यास विरोध दर्शविला होता. त्या सत्तार यांना अखेर मातोश्रीवर प्रवेश मिळालाच. शिवसेना नेत्याच्या इशाऱ्याकडे पक्षप्रमुखांनी दुर्लक्षच केल्याचे दिसले. दरम्यान पक्षप्रमुखांनी आदेश दिल्याने सध्या वादावर पडदा पडला असला तरी जिल्ह्याच्या राजकारणात सत्तार आणि खैरे असा संघर्ष यापुढेही दिसणार आहे.
डोणगावकर दाम्पत्यांचे पुनर्वसन ?
माजी जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, उपजिल्हाप्रमुख कृष्णा डोणगावकर यांची ४ जानेवारी रोजी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जि. प. निवडणुकीत केलेली बंडखोरी या दाम्पत्याला भोवली आहे. पक्षातील सूत्रांनी सांगितले की, २१ जानेवारी रोजी जि. प. निवडणुकीबाबत औरंगाबाद खंडपीठात सुनावणी आहे. त्यानंतर डोणगावकर दाम्पत्यास पुन्हा पक्षात घेण्याबाबत विचार होईल.