‘पीटलाईन’शिवाय नवी रेल्वे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:26 AM2017-12-22T00:26:11+5:302017-12-22T00:26:16+5:30
चिकलठाणा येथे पीटलाईन बनविण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पीटलाईनसाठी २४ रेल्वे बोगींची जागा आवश्यक असून, प्रत्यक्षात चिकलठाण्यात २० बोगींएवढीच जागा आहे. भविष्यात रेल्वेला २४ पेक्षा अधिक बोगी वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे जागेअभावी चिकलठाणा येथील पीटलाईन बारगळण्याचे संकट निर्माण झाले. परिणामी नव्या रेल्वेचा प्रवासही अवघड होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चिकलठाणा येथे पीटलाईन बनविण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पीटलाईनसाठी २४ रेल्वे बोगींची जागा आवश्यक असून, प्रत्यक्षात चिकलठाण्यात २० बोगींएवढीच जागा आहे. भविष्यात रेल्वेला २४ पेक्षा अधिक बोगी वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे जागेअभावी चिकलठाणा येथील पीटलाईन बारगळण्याचे संकट निर्माण झाले. परिणामी नव्या रेल्वेचा प्रवासही अवघड होईल.
चिकलठाणा येथे पीटलाईन करण्यासाठी ११ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर वर्षभरात पीटलाईनचे काम पूर्ण होईल. या एका पीटलाईनमुळे किमान तीन ते चार नव्या रेल्वे सुरू होतील, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी सप्टेंबरमध्ये औरंगाबाद दौºयात दिली होती. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी बुधवारी चिकलठाण्यात पीटलाईनच्या जागेची पाहणी केली. या पाहणीत पीटलाईनसाठी जागेची असलेली अडचण त्यांच्यासमोर आली.
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादहून दिल्ली, मुंबईसाठी नव्या रेल्वे सुरू होण्याची मागणी होत आहे. नवीन रेल्वे सुरूकरताना सुरक्षेच्या दृष्टीने देखभाल-दुरुस्ती महत्त्वाची आहे. पूर्णा येथील पीटलाईनवरून देखभाल-दुरुस्ती करून रेल्वे औरंगाबादला आणणे शक्य नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे नव्या रेल्वेची प्रतीक्षा औरंगाबादकरांना करावी लागत आहे. चिकलठाणा येथे पीटलाईन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यासाठी प्रारंभी जमीन, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि पाण्याची सुविधा असल्याचे सांगण्यात आले; परंतु त्यात आता जागेची अडचण असल्याचे सांगितले जात आहे. सध्या किमान २४ बोगींची रेल्वे धावते. त्यामुळे ४ बोगींसाठी एक एकर जागेची रेल्वेला आवश्यकता आहे. पीटलाईनअभावी नव्या रेल्वेसाठी आणखी वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर येणार असल्याचे दिसते.
औरंगाबादेतच पीटलाईन
पीटलाईनचा प्रस्ताव गेलेला आहे. त्यात २० बोगींची जागा असल्याचे नमूद आहे. हा प्रस्ताव प्रारंभी अवस्थेत असून, रेल्वे मंत्रालय निर्णय घेईल. चार बोगींच्या जागेसाठी ९० मीटर म्हणजे जवळपास एक एकर जागेची आवश्यकता आहे. राज्य सरकारकडून जमीन मिळाली नाही तर तसेच काम चालविले जाईल. तरीही काही अडचण आली तर औरंगाबादेत अन्य जागेत पीटलाईन केली जाईल. कुठेना कुठे पीटलाईन होईल.
- त्रिकालज्ञ राभा, डीआरएम, नांदेड, दक्षिण मध्य रेल्वे