पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही
By Admin | Published: March 27, 2017 11:54 PM2017-03-27T23:54:28+5:302017-03-27T23:59:47+5:30
पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही
लातूर : लातूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसला, तरी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या काँग्रेस भवन येथे मुलाखती घेतल्या असून, भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत झाली. तर राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा घेऊन प्रचाराला प्रारंभ केला.
आॅनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला. एकूण १८ प्रभागांतील ७० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तीन प्रभागांसाठी एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आला असून, त्यांच्या कार्यालयात उमेदवारांना आॅनलाईन उमेदवारी दाखल करता येणार आहे, अशी माहिती मनपाचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली. प्रभाग क्र. १, २ व ७ साठी उपविभागीय अधिकारी भवानजी आगे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. जुने जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे कार्यालय असेल. उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांच्याकडे ३, ४ आणि ५ या प्रभागांची जबाबदारी असून, मनपा कार्यालयात त्यांचे कार्यालय असणार आहे. उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्याकडे ६, १६ आणि १८ हे प्रभाग असून, त्यांचे कार्यालय मनपा कार्यालयातील खोली क्र. २८ मध्ये आहे. उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी ८, ९ आणि १० प्रभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्याकडे ११, १२ आणि १३ प्रभागांची जबाबदारी असून, त्यांचे कार्यालय मनपातील खोली क्र. ४२ मध्ये असेल. उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्याकडे १४, १५ आणि १७ प्रभागांची जबाबदारी असून, लातूर तहसील येथे त्यांचे कार्यालय असेल.