महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या स्वबळाच्या ‘जोर’बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 07:08 PM2020-02-01T19:08:20+5:302020-02-01T19:10:09+5:30
निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसंदर्भात ३ फेब्रुवारी रोजी वॉर्ड आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.
भाजप स्वबळाच्या दृष्टीने जोरदार तयारी करीत आहे. पक्षाकडून वॉर्डनिहाय बैठकींचा ‘सिलसीला’ सुरू झाला आहे. वंचित बहुजन आघाडीही स्वबळावर निवडणूक लढण्याचा विचार करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना-काँग्रेससोबतच्या आघाडीत लढण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठांनी आघाडीसंदर्भात कोणतेच संकेत दिले नसल्याने स्थानिक पातळीवर स्वबळाची तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेने स्वबळासाठी कंबर कसली आहे.
महापालिकेत १९८८ पासून २०१५ पर्यंतच्या सहा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. स्वतंत्र निवडणुका लढवून परत सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येत. आता दोन्ही पक्षांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात युती केली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग होणार किंवा नाही याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. ३ फेब्रुवारी रोजी वॉर्डांचे आरक्षण जाहीर झाल्यावर ११५ वॉर्डांचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच पुढील राजकीय रणनीती ठरविण्यावर सर्वच राजकीय पक्षांनी भर दिला आहे. समविचारी पक्षांसोबत ऐनवेळेपर्यंत युती होईल किंवा नाही, यावर कोणीच ठाम नाही. त्यामुळे बहुतांश पक्षांनी स्वबळाची तयारी ठेवली आहे.
शिवसेनेचीही स्वबळाचीच तयारी
महाविकास आघाडीसंदर्भात वरिष्ठांकडून अद्याप कोणताही निर्णय प्राप्त नाही. वरिष्ठांनी सांगितल्यानुसारच निवडणूक लढविण्यात येईल. आरक्षणानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. पक्षपातळीवर आम्ही स्वबळाच्या हिशोबाने तयारी पूर्णपणे करून ठेवली आहे.
- आ. अंबादास दानवे, शिवसेना, जिल्हाप्रमुख
भाजपकडून स्वबळाची तयारी
रिपाइं आठवले गट, वंचित बहुजन आघाडी यांना सोबत घेता येऊ शकते का, याची चाचपणी करीत आहोत. यासंदर्भात कोणताही निर्णय पक्षाची कोअर कमिटीच घेणार आहे. कोणासोबतही युती न झाल्यास स्वबळाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. -संजय केणेकर, शहराध्यक्ष भाजप
राष्ट्रवादीचा फायदा आघाडीत
राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा निवडणूक आघाडीसोबत लढविल्यास फायदा होईल, असे वाटत आहे. वरिष्ठ यासंदर्भात जे आदेश देतील त्याचे पालन करण्यात येईल. पक्ष म्हणून स्वबळाची तयारी ठेवलेली आहे.
-विजय साळवे, शहाराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
वरिष्ठांकडून कोणतेच संकेत नाहीत
राज्यातील महाविकास आघाडीसंदर्भात वरिष्ठांकडून अद्याप कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. वरिष्ठांकडून ऐनवेळी आदेश आल्यास त्यादृष्टीने काम करण्यात येईल. स्वबळाच्या दृष्टीने आमची तयारी आहे.
-नामदेव पवार, शहाराध्यक्ष काँग्रेस
अद्याप कोणाचाही प्रस्ताव नाही
वंचित बहुजन आघाडीने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. कोणत्याच राजकीय पक्षाचा प्रस्ताव आमच्याकडे आला नाही. एखाद्या पक्षासोबत युती करायची असेल तर अंतिम निर्णय पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर घेतील.
-अमित भुईगळ, ‘वंबआ’चे नेते