अहवालानंतरही मुख्याध्यापकावर कार्यवाही नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:37 PM2018-12-27T18:37:55+5:302018-12-27T18:38:24+5:30
वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेतील अनागोंदी कारभाराच्या शालेय व्यवस्थापन समितीने तक्रारी केल्या. यावरुन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देत पाहणी करुन या संबंधिचा अहवाल शिक्षणाधिका-यांना सादर केला.
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेतील अनागोंदी कारभाराच्या शालेय व्यवस्थापन समितीने तक्रारी केल्या. यावरुन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देत पाहणी करुन या संबंधिचा अहवाल शिक्षणाधिका-यांना सादर केला. मात्र, संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध कार्यवाही करण्यास शिक्षण विभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शालेय समितीच्या पदाधिकाºयांनी केला आहे.
पंढरपूर केंद्रांतर्गत येणाºया वडगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय भोरे यांच्याविरुद्ध शालेय समितीचे अध्यक्ष कृष्णा पा. साळे यांनी तक्रारी करुन चौकशीची मागणी शिक्षण विभागाकडे केली होती.
विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपात घोळ करणे, शालेय समिती अध्यक्ष व पालकांच्या बनावट स्वाक्षºया करुन गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या भत्त्याचे पैसे हडप करणे, शाळेला सामाजिक संस्थांनाही दिलेल्या भेटवस्तू गायब करणे, शाळा दुरुस्ती व विविध कामांसाठी मिळालेल्या निधीचा अपहार करणे, शाळेच्या वर्गखोल्या व मैदान परस्पर विवाह समारंभ व सामाजिक उपक्रमासाठी परस्पर देऊन पैसे घेणे, शिक्षकांना मानसिक त्रास देणे, शिक्षकांच्या अर्जित रजांत घोळ करणे आदी स्वरुपाच्या तक्रारी होत्या.
शिक्षण विस्तार अधिकाºयांनी शाळेला भेट देत पाहणी केली. याचा अहवाल सादर केला. मात्र, संबंधित मुख्याध्यापकावर अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. यासंदर्भात मुख्याध्यापक संजय भोरे म्हणाले की, माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे असून, तक्रारीत तथ्य नाही. नवीन शालेय समितीच्या निवड करण्यावरुन कृष्णा साळे हे नाहक त्रास देत आहेत.
चौकशी अहवाल शिक्षण विभागाकडे
दीड महिन्यापूर्वी शिक्षण विस्तार अधिकारी कोमटवार यांनी या शाळेला भेट देऊन चौकशी केली होती. यात शाळेतील रेकार्डची तपासणी करण्यात आली. यात अनेक ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे. या संदर्भात चौकशी करुन सविस्तर अहवाल शिक्षणाधिकाºयांकडे सादर केला आहे. कार्यवाहीचे अधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.एन.कोमटवार यांनी सांगितले.