शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:33 PM2019-03-18T22:33:20+5:302019-03-18T22:33:36+5:30
कोल्हाटी भातु समाजातर्फे पंढरपूर येथील वैष्णोदेवी उद्यानात रविवारी राज्यस्तरीय कोल्हाटी समाज, वधु-वर परिचय व गुण गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वाळूज महानगर : शिक्षणाअभावी कोल्हाटी समाज विकासापासून कोसो दूर आहे. समाजाची प्रगती करायची असेल, सन्मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकांनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणासाठी मुलांना पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत पंढरपूर येथे रविवारी (दि.१७) आयोजित कोल्हाटी समाजाच्या राज्यस्तरीय समाज, वधू-वर परिचय व गुणगौरव सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
विखुरलेले कोल्हाटी समाजबांधव एकत्र यावेत, एकमेकांची ओळख व्हावी. तसेच समाजाची पुढील दिशा ठरविण्यासाठी औरंगाबाद जिल्हा कोल्हाटी भातु समाजातर्फे पंढरपूर येथील वैष्णोदेवी उद्यानात रविवारी राज्यस्तरीय कोल्हाटी समाज, वधु-वर परिचय व गुण गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जयराम मुसळे म्हणाले की, परिस्थितीनुसार समाजाने बदलणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले. त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार अंमलात आणा. पूर्वी शिक्षण नसल्याने समाजाची वाईट अवस्था होती. पण आता शिक्षणाची सोय झाली असून, प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणामुळे इतर समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यामुळे समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. असे सांगितले.
प्रिया काळे यांनी शिक्षण घेतल्या शिवाय समाजाचा विकास नाही असे सांगत शिक्षणासाठी आई-वडिलांना मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सांगितले. यावेळी प्रभाकर गंगावणे, युवराज गांगवे, अविष्कार गंगावणे, राहुल पवार आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. १०३ वरांनी तर ४३ वधुंनी विवाहासाठी नोंदणी केली.
कार्यक्रमाला आदित्य जाधव, प्रविण भोसले, श्रीकृष्ण काळे, उमाकांत पवार, गणेश जाधव, नंदकिशोर मुसळे, भाऊलाल काळे, लता मुसळे, काजल काळे, नारायण काळे, एकनाथ काळे, सुनिल काळे, रघुनाथ जाधव, सोमिनाथ काळे, मदन काळे, दिलीप पवार आदींसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाफेश्वर गंगावणे यांनी केले. तर संतोष चंदन यांनी आभार मानले.